राज्यात गो हत्या बंदी कायद्यांतर्गत पशुधनाची कत्तल करण्यास प्रतिबंध असताना त्यासाठी महिंद्रा जीपमधून नेल्या जाणाऱ्या सात गायी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या प्रकरणी दोघांना अटक करत त्यांच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, येवला शहर पोलिसांनी नगर-मालेगाव रस्त्यावर जीपमध्ये गोमांस नेणाऱ्या दोघांना पकडले.
गो हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतरही त्याचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी केल्या जातात. आतापर्यंत त्या स्वरुपाचे काही प्रकारही जागरुक कार्यकर्त्यांनी उघड केले आहेत. पुन्हा तसाच प्रकार पोलीस गस्तीदरम्यान समोर आला. उपनगर पोलिसांचे पथक मंगळवारी पहाटे पाच वाजता गस्त घालत होते. यावेळी टाकळी रोडने जीप संशयास्पदपणे जाताना दिसली. पोलिसांनी गाडी चालकास हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या जीपमध्ये सात गायी असल्याचे आढळून आले. कत्तलीसाठी या गायी नेल्या जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी रफिक सय्यद (वडाळा गाव), योगेश रमेश आहेर (सुरगाणा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, येवला शहर पोलीस पथकाने कारवाई करून महिंद्रा गाडीसह गोमांस असा सुमारे दोन लाख पाच हजाराचा
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नगरकडून मालेगावकडे जीप निघाली होती. तिची तपासणी केली असता गाडीत गोमांस आढळून आले. फतेबुरूज नाका येथे ही गाडी पकडण्यात आली. या प्रकरणी मोसिम खान (३३, नगर) आणि जाकीर शेख (नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जीपसह सुमारे दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.