राज्यात प्रतिबंधित असलेला चार लाख रुपयांचा मद्यसाठा दोन चारचाकी वाहनांसह वेगवेगळ्या ठिकाणी पकडण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत विक्रीच्या उद्देशाने वाहतूक होणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला.  राज्यात प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा दमण व दादरा नगर हवेली येथे विक्रीस परवानगी आहे. तो छुप्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला. तवेरा व महिंद्रा पीक अप चारचाकी वाहनातून वेगवेगळ्या प्रकारचे ७६ बॉक्स मद्यसाठा जप्त करण्यात आला.   सिन्नर तालुक्यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली आणि सिन्नर-घोटी मार्गावर तसेच अंबड येथे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चार लाखांच्या मद्यसाठय़ासह साडेआठ लाख किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आला.

ग्रामीण पोलिसांचीही कारवाई

पिंपळगाव बसवंत परिसरातून पावणेदोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत दोन जणांना अटक करण्यात आली.  पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी संघाच्या कार्यालयासमोर सापळा रचला. चंदेरी रंगाची ओम्नी अडविण्यात आली. त्याची तपासणी केली असता अवैध मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी संशयित रवींद्र पवार (२२, रा. चांदवड), पप्पू सहाणे (२३, रा. चांदवड) यांना अटक करण्यात आली. देशी दारूचा ७४,८८० साठा, रोख रक्कम व ओम्नी वाहन असा एकूण एक लाख ७८,२७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.