मुंबई नाक्यावरील कारवाईत पावणे सहा लाख हस्तगत

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेस गुरुवारी रात्री मोठे यश मिळाले. या ठिकाणी तब्बल पाच लाख ७२ हजार रुपयांची रोकड आढळून आली. शिवाय, हवालदारही सापडला. मुंबई नाका पोलीस ठाण्यापासून समीप असलेल्या या जुगार अड्डय़ाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. स्थानिक पोलीस ठाण्याने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या अड्डय़ावर एकूण ४१ जणांना अटक करण्यात आली. ज्या ठिकाणी हा अड्डा चालविला जात होता, ती जागा कोणाच्या मालकीची, वीज जोडणी कोणाच्या नावावर आहे याची छाननी पोलीस करत आहे. गणेशोत्सव काळात अनेक सार्वजनिक मंडळांकडून ‘नाल’ या जुगाराला प्रोत्साहन दिले जाते. या अड्डय़ाचा तसा काही संदर्भ आहे काय, याची छाननी करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मुंबई नाका परिसरातील गायकवाडनगर येथील अड्डय़ावर कारवाई करताना स्थानिक पोलीस ठाण्यालाही माहिती दिली गेली नाही. या अड्डय़ावर जुगार खेळणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे आणि लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने अड्डय़ाला चारही बाजूने घेरत कारवाई केल्यामुळे कोणाला पळ काढता आला नाही. एकाच वेळी थोडेथोडके नव्हे तर, ४१ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात मुंबई नाका पोलीस ठाण्यातील हवालदार कैलास चव्हाणचाही समावेश आहे. तसेच अनेक बडय़ा व्यावसायिकांचाही समावेश आहे. त्यांची चारचाकी व दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. छापा टाकल्यानंतर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घटनास्थळी भेट दिली. अड्डय़ावर सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची त्यांनी झाडाझडती करत कारवाईचे संकेत दिले. मुंबई नाका पोलीस ठाण्याने या अड्डय़ाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कारवाईचा थांगपत्ता संबंधितांना लागू दिला नसल्याची चर्चा आहे.

कारवाईनंतर इतकी मोठी रोकड आढळली, की तिची मोजदाद करण्यासाठी नोटा मोजण्याचे यंत्र मागवावे लागले. अखेरीस ही रक्कम पाच लाख ७२ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. गणेशोत्सव काळात अनेक सार्वजनिक मंडळ ‘नाल’ या जुगाराला चालना देत असल्याचे सांगितले जाते. गायकवाड मळ्यातील अड्डय़ाचा तसा काही संबंध आहे काय, याची छाननी होण्याची गरज व्यक्त होत आहे. या अड्डय़ाला राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा असली तरी पोलिसांनी तपासात अद्याप तशी काही स्पष्टता झाली नसल्याचे नमूद केले. ही जागा नेमक्या कोणाच्या मालकीची आहे, या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या विजेची जोडणी कोणाच्या नावावर आहे हा तपासाचा भाग असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

माजी आमदाराचा खरा चेहरा समोर – मनसेचा आरोप

मुंबई नाका परिसरात गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्यासाठी माजी आमदाराच्या अधिपत्याखाली नाल प्रकारचा जुगार चालविला जातो. त्यावर गणेश उत्सव व इतर कार्यक्रम ही मंडळी राबविते. परंतु, या अड्डय़ावर राजकीय वरदहस्त असल्याने आजपर्यंत कधी कारवाई झाली नव्हती. गुरुवारी पोलिसांनी अचानक छापा टाकून माजी आमदाराचा खरा चेहरा समोर आणल्याचे मनसेने म्हटले आहे. एकीकडे जुगाराच्या माध्यमातून नागरिकांना बरबाद करायचे आणि दुसरीकडे धार्मिक कार्यक्रम राबवून आपली प्रतिमा उजळ करायची हा या माजी आमदाराचा गोरखधंदा असल्याचा आरोपही मनसेने केला.