केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपकडून चांगल्या कामांद्वारे पक्षाची प्रतिमा उंचावली जात असताना महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुंडाला प्रवेश देऊन प्रतिमा मलिन केल्याची प्रतिक्रिया खुद्द भाजपच्या वर्तुळात उमटत आहे. महिनाभरापूर्वी प्रदेश पातळीवरील नेत्याच्या पुतण्याविरुद्ध गुन्हेगारी टोळीला आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली होती. मुंबई नाका येथे पोलिसांनी कारवाई केलेल्या जुगार अड्डय़ाशी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर आरोप झाले. हे कमी म्हणून की काय, पोलीस कर्मचाऱ्याचा खून व खंडणीसारखे गुन्हे दाखल असलेल्या पवन पवारला प्रवेश दिला गेला. या मुद्दय़ावरून भाजपमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत तीन ते चार जणांनी स्थानिक पातळीवर पक्ष ‘हायजॅक’ केला आहे. त्यांच्यामार्फत असे वादग्रस्त निर्णय रेटले जात असून इतरांना अंधारात ठेवले जात असल्याचे सांगितले जात आहे.
वाढती गुन्हेगारी हा शहरातील प्रत्येक निवडणुकीतील महत्त्वाचा विषय ठरतो. गुन्हेगारांना राजाश्रय लाभल्याने ती फोफावल्याचे सर्वश्रुत आहे. गुंडगिरीच्या प्रश्नावरून आजवर भाजपने राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले होते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुंडाला भाजपच आता आधार देत असल्याचा संदेश पवन पवारच्या प्रवेशाने गेल्याचे पक्षाच्या एका गटाचे म्हणणे आहे. यामुळे भाजप विरोधकांच्या आक्षेपांना कसा प्रत्युत्तर देणार, असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला. २२ गुन्हे दाखल असलेल्या पवारला पक्षात घ्यायचे की नाही, याबद्दल स्थानिक पातळीवर शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी कोणतीही चर्चा केली नाही. संबंधित गुंडाचा पक्षात प्रवेश होईपर्यंत सारेच अनभिज्ञ होते. संघटनेवर कब्जा करणाऱ्या तीन ते चार जणांनी परस्पर ठरवून पवारला प्रवेश दिल्याचा सूर उमटत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार चांगले काम करत आहे. महापालिका निवडणुकीत त्याचा लाभ होणार असताना गुंडाला प्रवेश देऊन पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे संबंधितांनी मान्य केले.
बाहुबलीला प्रवेश देऊन शिवसेनेसह विरोधकांना भाजपने नवीन मुद्दा दिला. त्याची प्रचीती येऊ लागली आहे. भाजपची नीतिमत्ता घसरल्याचा आरोप सेनेने केला तर राष्ट्रवादीने भाजपवर तोंडसुख घेतले. या आरोपांना उत्तर देणे अवघड होणार असून गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या मंडळींची हकालपट्टी करून पुन्हा तसा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना करावी, अशी मागणी दुसऱ्या गटाने प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या घडामोडींमुळे भाजपमध्ये स्थानिक पातळीवर दोन गट पडल्याचे उघड झाले आहे. महिनाभरापूर्वी पोलिसांनी पंचवटीतील कुंदन परदेशी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली. तपासात या टोळीला अजय बागूलने आर्थिक साहाय्य दिल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रकरणात त्याच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई केली गेली.
संशयित हा भाजपचे प्रदेश पदाधिकारी सुनील बागूल यांचा पुतण्या आहे. मुंबई नाका येथील जुगार अड्डय़ावर पडलेल्या छाप्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यावर मनसेने आरोप केले होते. गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी संबंधिताकडून हा जुगार चालविला गेल्याचा आरोप मनसेने केला होता. गुंडाला पक्षात प्रवेश दिल्यावरून पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याची बाब वरिष्ठांसमोर मांडली जाणार आहे. या संदर्भात शहराध्यक्ष आ. सानप यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.