मालेगाव-मनमाड रस्त्यावर चालक व वाहकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकून लंपास केलेले लाखो रुपयांचे लसूण हस्तगत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. या प्रकरणी एकास अटक झाली असून उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे.

२० ऑगस्ट रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडय़ाची ही घटना घडली होती. मालेगाव-मनमाड रस्त्यावरील जळगाव चोंढी शिवारात लसूण भरलेली मालमोटार आठ ते दहा संशयितांनी अडविली. वाहक व चालकाला चाकूचा धाक दाखवत डोळ्यांत मिरचीची पूड फेकून संशयितांनी मालमोटारीचा ताबा घेतला. १६ टन लसूण, एक दुचाकी, भ्रमणध्वनी आणि रोकड असा तब्बल २८ लाखाचा माल घेऊन संशयित पसार झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाबाबत मार्गदर्शन केले. या शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरू केला. गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अकोला येथून अंबादास ऊर्फ काळू हिरामण इरले (रा. देवळाली प्रवरा, अहमदनगर) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर दरोडय़ाचा उलगडा झाला. इरले व त्याच्या साथीदारांनी लंपास केलेला १६ टन पैकी १० टन माल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी असल्याचे भासवून विकला. ही माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने उपरोक्त ठिकाणाहून १२ लाख रुपये किमतीचा १० टन लसूण हस्तगत केला. या गुन्ह्यात पळविलेली मालमोटार कल्याण येथून हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली स्कोडा कारही अहमदनगर येथून जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील संशयित सराईत गुन्हेगार असून इतर फरारी झालेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.