जेनेरिलाईफ कंपनीच्या संस्थापकांचे मत
परदेशात डॉक्टर रुग्णांना औषधे लिहून देतानाच जेनेरिक औषधांना प्राधान्य देतात. अमेरिकेत औषधांच्या १० चिठ्ठय़ांमध्ये आठ चिठ्ठय़ा जेनेरीक औषधे घेण्यास सांगणाऱ्या असतात. भारतात सर्व प्रकारच्या रुग्णांना गुणवत्तापूर्ण औषधे सवलतीच्या दरात मिळण्यासाठी डॉक्टरांमध्ये प्रथम या औषधांचा प्रसार होणे गरजेचे असल्याचे मत जेनेरिलाईफ कंपनीचे संस्थापक सचिन बिरारी यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्रातील पहिली संस्था असणाऱ्या जेनेरिलाईफने प्रत्येक जिल्ह्यात दहा यानुसार देशात ६४४० स्वस्त औषध विक्री केंद्रांची श्रृंखला निर्माण करण्याचे जाहीर केले. या केंद्रांमार्फत जवळपास ५०० हून अधिक जेनेरिक औषधे अल्प दरात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जेनेरिलाईफ कंपनीचे आणि कंपनीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन सोमवारी व्होकार्ट कंपनीच्या माजी उपाध्यक्षा मेधा धारगळकर, प्राचार्य डॉ. अविनाश ढाके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. विजय अहिरे, मिलींद कुटे, संयोगिनी बिरारी, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी बिरारी यांनी कंपनीच्या आगामी काळातील विस्ताराची माहिती दिली. कंपनी प्रारंभी देशभरात ‘स्वस्त औषधी केंद्र’ या नावाने नामवंत औषध कंपन्यांची जेनेरिक औषधे विकणारी श्रृंखला उभारणार आहे. सर्व प्रकारच्या आजारांवरील डॉक्टरांनी सुचविलेली औषधे ही ७० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिली जातील. तसेच जेनेरिक औषधांबाबत देशपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. विस्ताराच्या पुढील टप्प्यात कंपनी औषध निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पाश्चात्य देशात डॉक्टर अधिकतम जेनेरिक औषधे घेण्यास सुचवितात. रुग्णांचा औषधावरील खर्च कमी होण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशात डॉक्टरांद्वारे त्याच्या प्रसाराची गरज आहे. स्वस्त औषधी केंद्राच्या माध्यमातून देशातील तरुणांना उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बिरारी यांनी नमूद केले. धारगळकर यांनी जेनेरिकऔषधे ही ब्रॅण्डेड औषधांइतकीच प्रभावी व उपयुक्त असून असून ती सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतात, असे नमूद केले. जेनेरिलाईफने काळाची गरज ओळखून स्वस्त औषधी केंद्रांची शृंखला आणली असून त्याचा रुग्णांना लाभ होईल. जेनेरिक औषधांविषयी जनजागृती गरजेची असून त्यात रुग्णांचे हित असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक संयोगिनी बिरारी व निकेत जाधव यांनी आभार मानले तर डॉ. गणेश जाधव यांनी सूत्र संचालन केले.