जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

शहरातील आडगाव पोलीस ठाण्याची नवीन अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज इमारत राज्यातील इतर ठाण्यांसाठी पथदर्शी इमारत ठरेल, असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत आडगाव ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन बुधवारी महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी इमारतीतील व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या काळात अशा इमारतींची गरज असून नवीन इमारतीच्या रचनात्मक, सुविधायुक्त दर्जेदार कामामुळे येथे काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढेल. मधल्या काळात वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यात यश येत असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरातील मुंबई नाका व म्हसरुळ ठाण्यांसाठी नवीन जागा मिळवून चांगल्या सुसज्ज इमारती देण्याचा प्रयत्न असून शहर पोलीस मुख्यालयासाठी देखील २२ मजली इमारत, सुसज्ज फायरिंग रेंज आदी देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती दिली. याप्रसंगी आ. बाळासाहेब सानप, लक्ष्मीकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी इमारतीच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेल्या पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अधीक्षक अभियंता वृंदा गिरासे, कार्यकारी अभियंता अरुण नागपुरे, वास्तुविशारद  प्रविण पगार, ठेकेदार शैलेश चापसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आडगाव ठाण्यात आठ अधिकाऱ्यांसह ९१कर्मचारी कार्यरत असतील. नवीन इमारतीचे क्षेत्रफळ २१९० स्क्वेअर मीटर असून फर्निचर, बिनतारी यंत्रणा, तपासी अंमलदार, पोलीस अधिकाऱ्यांचे सुसज्ज कक्ष, महिला व पुरूष पोलिसांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, कोठडी, स्वागत कक्ष असणारी इमारत आहे. यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यतील पोलिसांसाठी २२०० घरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी जास्तीत जास्त घरे निर्माण करण्याकडे लक्ष पुरविले आहे. जिल्ह्यातही पोलिसांसाठी २२०० घरे निर्माण करण्यात येत आहेत. शहराची सुरक्षा वाढविण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल. त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे महाजन यांनी सांगितले.