द्राक्ष उत्पादकांच्या चर्चासत्रात गिरीश महाजन

वातावरणातील बदल आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता फळ पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघातर्फे गुरुवारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी आ. बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे आदी उपस्थित होते. पावसाचे प्रमाण मर्यादित असून धरणांची क्षमता तात्काळ वाढविणे शक्य नाही. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र शेती जगविणे तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याची बचत करण्यासाठी घरगुती पाण्याचा काटेकोरपणे वापर आवश्यक आहे. शेतीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग वापर केल्यास शेती आणि उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होईल. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे सर्वानी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. द्राक्ष बागांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होते.

जिल्ह्यात वायनरी उद्योगही विकसित होत असून त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन अर्थकारणाला गती मिळते आहे. त्यामुळे द्राक्षांचा दर्जा चांगला ठेवण्याबाबत आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योगाबाबतही चर्चासत्राच्या माध्यमातून विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा उल्लेख करून त्यांनी हे नुकसान मिळणाऱ्या मदतीपेक्षा अधिक असते. शासन आर्थिक सहकार्य करताना सर्व नुकसानीची भरपाई करू शकत नाही. त्यामुळे बदलत्या वातावरणात टिकणाऱ्या शेतीचा विचार होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्लास्टिक शेडची आयात करताना अधिक प्रमाणात कर भरावा लागत असल्याने देशांतर्गत उत्पादन करण्यासाठी विविध संस्थांशी चर्चा करण्यात येत आहे. लवकरच अशा स्वरूपाचे आच्छादन देशात उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.