मलवाहिन्यांची वहन क्षमता बाधित झाल्यामुळे प्रदूषणात भर; मुख्यमंत्र्यांची कबुली

नैसर्गिक पूरक प्रवाह नसल्याने तसेच महानगरपालिका क्षेत्रात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मलवाहिन्यांची वहनक्षमता मोठय़ा प्रमाणात बाधित झाल्याने काही प्रमाणात गोदावरी नदी पात्रात प्रदूषण झाल्याचे आढळून आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानपरिषदेत मान्य केले. त्यासाठी गोदावरी नदीपात्र दूषित होऊ नये, स्वच्छता राखली जावी म्हणून पालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यात दिर्घकालीन उपायांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

गोदावरी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात आ. डॉ. अपूर्व हिरे व अन्य सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. पात्र प्रदूषित होऊ नये यासाठी २०४१ पर्यंतचा मलनि:सारण व्यवस्थापन आराखडा महानगरपालिकेने तयार केला आहे. त्याची टप्प्याटप्प्याने अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या आराखडय़ातंर्गत अमृत योजनेतून गंगापूर येथे १८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या महसुलात वाढ होण्यासाठी व पर्यटनाच्या दृष्टिने गोदावरी नदीवरील घाट, मैदाने आणि साधुग्रामसह इतर सर्व मोकळे भूखंड जतन करून त्यांची नियमित देखभाल करण्यासंदर्भात निवेदने प्राप्त झाली असून पालिकेच्या मालकीच्या जागेवरील साधूग्राम व इतर मोकळे भूखंड यांची नियमित देखभाल करण्यात येते.

सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेले घाट व त्यालगतची जागा देखभालीसाठी पालिकेकडे हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून घाट व त्यालगतची जागा तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील साधूग्राम व इतर मोकळे भूखंड यांचा वापर चौपाटी, विविध प्रदर्शन, सार्वजनिक सभा, क्रीडा स्पर्धा, खुले वाहनतळ व तत्सम प्रयोजनासाठी करून त्याव्दारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे नियोजन आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

स्वच्छतेसाठी उपाययोजना

नदीपात्राची स्वच्छता राखण्यासाठी करण्यात उपाययोजनां करण्यात येणार आहेत. पानवेली काढण्यासाठी निविदा काढून एजन्सीमार्फत कामे प्रस्तावित असणे, महापुराने बाधित झालेल्या मलवाहिका व चेंबरची दुरूस्ती पालिकेमार्फत केली जाणे, रामघाट परिसर व नदीवरील पुलांवर निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंड ठेवण्यात येणे, रामकुंड तथा रामघाटाची दैनंदिन स्वच्छता पालिकेमार्फत राखणे, प्रायोगिक तत्वावर दोन पुलांच्या बाजूने गोदावरी पात्रात निर्माल्य टाकण्यास अटकाव करण्यासाठी जाळी बसविणे आदींचा या योजनेत समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.