नाशिक जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत’ अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ‘गुड मॉर्निंग’ पथक सक्रिय झाले आहे. या पथकाने नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या पथकाने उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांजवळील टमरेल जप्त करत त्यांची फजिती केली.

‘गुड मॉर्निंग’ पथक सकाळीच मल्हारवाडी परिसरातील डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले. त्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. हगणदारी मुक्त योजनेची माहिती देऊन जागृती केली. घरात शौचालये बांधा, असे आवाहन केले. स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व पटवून देताना उघड्यावर शौचास बसल्यास अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रोगराई पसरते, असे त्यांना सांगितले. जनजागृतीनंतरही शौचालय न बांधणाऱ्या ग्रामस्थांना कलम ११५ व ११७ नुसार १२०० रुपये दंड किंवा ६ महिन्यांची शिक्षा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक रवींद्र पाटील यांनी दिली.