भारताला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या वारशामुळे भारताने अनेक शतके जगाला प्रभावित केले. अमेरिकेतील एका कार्यक्रमात चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केल्याचा संदर्भ देऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे समर्थन करतानाच तेव्हा आम्हाला सीमेवर सैनिक अथवा बॉम्ब ठेवण्याची तसेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचीही गरज पडली नसल्याचे प्रतिपादन केले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित १९ व्या जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात राव यांच्या हस्ते अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनील काकोडकर यांना ‘सर डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अ‍ॅवार्ड २०१६’ने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी राव यांनी भारताशी निगडीत ऐतिहासिक संदर्भ उलगडले. सध्या देशाची सीमा संवेदनशील बनली आहे. अत्यंत प्रगल्भ असा सांस्कृतिक वारसा लाभलेला भारत १७ व्या शतकापर्यंत जगाला मार्गदर्शन करत होता. संस्कृती हिच देशाची खरी ताकद असल्याने सीमेवर कारवाईची गरज भासली नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली. पुरस्काराला उत्तर देतांना डॉ. काकोडकर यांनी शिक्षणातील संशोधन विकास यांचे महत्व विषद केले. ज्ञान, अर्थव्यवस्था आणि व्यापक समाज या तीन घटकांवर काम करणे गरजेचे असून हे तिन्ही क्षेत्र एकमेकांवर अवलंबून आहेत. अर्थव्यवस्थेत व्यापार आणि समाज ही क्षेत्रे महत्वाची असली तरी दोन्ही क्षेत्रांना ज्ञानाची गरज आहे. शिक्षणातून मन प्रबुध्द बनते आणि त्यातून शांतता लाभते. ज्ञान आणि शांतीचा संगम महत्वाचा आहे. मनुष्यबळाच्या विकासाद्वारे आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणे शक्य आहे. उन्नत ज्ञानाच्या आधारे असे बदल घडवून आणता येतील. देशात सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी जागरुक समाज निर्माण होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुपोषणाचे भडक चित्रण

कुपोषणामुळे आदिवासी भागातील बालमृत्यूवर बरीच चर्चा होत आहे. गोखले एज्युकेशन संस्था पालघरमध्ये कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहे ही महत्वाची बाब आहे. मुंबई लगतच्या पालघर, डहाणू परिसरात भुकेने बळी जाणाऱ्यांच्या बातम्यांमुळे या भागाची स्थिती ‘इथोओपिया’प्रमाणे असल्याचे चित्र रंगविले जाते. परंतु, वास्तवात तशी स्थिती नाही. शिक्षणामुळे उपरोक्त भागातील हे चित्र बदलण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.