ढोल-ताशांचा आवाज, हलगीच्या तालावर थिरकणारी पाऊले, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी.. अशा उत्साहपूर्ण वातावरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजित १५ व्या ‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी पार पडली. येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिंडीचा समारोप झाला. संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

येथील रावसाहेब थोरात सभागृहात वसलेल्या वामनदादा कर्डक साहित्य नगरीत संमेलनास सुरूवात झाली. तत्पूर्वी, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.

यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे मिलिंद जहागिरदार यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीत भारतीय संविधान, सावरकरांचे माझी जन्मठेप, कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह,

ज्ञानेश्वरी अशी ग्रंथसंपदा ठेवण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली.

यावेळी जहागिरदार यांनी विद्यार्थी परिषदेच्या या अनोख्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना साहित्यिक विश्वाची चौफेर सफर घडवितांना त्यांना व्यक्त होण्यासाठी हे संमेलन महत्त्वाची भूमिका निभावत आहे. विद्यार्थ्यांसाठी अपवादाने असे उपक्रम होत असल्याने साहित्य चळवळ अधिक बळकट होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रशांत साठे, प्रदेशमंत्री राम सातपुते, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, कार्याध्यक्ष महेश दाबक आदी उपस्थित होते.

दरम्यान, ग्रंथदिंडीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी होत कलाविष्कार सादर केले. काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत मराठी संस्कृतीचा परिचय दिला. विद्यार्थ्यांच्या एका पथकाने खास आदिवासी नृत्य सादर करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय ढोल-ताशा पथकाने दिंडीची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली.