जिल्ह्य़ातील वाइन उद्योगाची सर्वत्र चर्चा असल्याने या उद्योगाच्या वाढीस अडथळा ठरणाऱ्या समस्यांचे निवारण जलदपणे होण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागात वाइन उद्योगाची भरभराट होऊन द्राक्ष उत्पादकांना भविष्यातही उत्पादन विक्रीची शाश्वत हमी राहील. तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होण्याची आशा वाइन उद्योगाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. मागील वर्षभरात आपत्तींना तोंड देत शेतकऱ्यांनी मोठय़ा कष्टाने शेतमाल पिकवला असताना अवकाळी पावसाने ऐन काढणी अवस्थेत असलेला माल हिसकावून नेला आहे. पावसामुळे द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे काढणीयोग्य व लवकरच काढणीसाठी लायक होणाऱ्या मण्यांना मोठय़ा प्रमाणात तडे पडले. मण्यांमधील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. अशा समस्यांमुळे तसेच व्यापारी वर्गाने ऐन वेळी द्राक्षमाल नाकारल्याने निर्यातक्षम द्राक्ष तसेच देशांतर्गत द्राक्षांना मोठय़ा प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. व्यापारी बाजारभावापेक्षा कमी दराने द्राक्ष खरेदी करण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत बेदाणेनिर्मितीसाठीही द्राक्षांची खरेदी होत नसल्याने अखेरीस वायनरींसाठी द्राक्षांची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येऊ लागली आहे.
‘सुला विनीयार्डस्’ने अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या हाकेला ओ देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची द्राक्षे विकत घेतली. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी नसतानाही विनीयार्डने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या द्राक्षांचे गाळप करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी व या वर्षांतील नैसर्गिक आपत्तीचा विचार करून राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी तसेच या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना विविध करांमध्ये सवलती द्याव्यात, अशा उद्योगांच्या वाढीसाठी शासनस्तरावर सहकार्य करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या वतीने वाइन उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज मांडण्यात आली आहे. तसे केल्यास द्राक्ष उत्पादकांना भविष्यातही उत्पादन विक्रीची शाश्वत हमी राहील. याबाबत मदत हवी असणाऱ्या शेतकऱ्यांनी नाना शेळके (९८६०१९००२०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.