द्राक्ष हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असताना परतीच्या पावसाने झालेले बागांचे नुकसान वातावरण शुष्क झाल्यानंतर खऱ्या अर्थाने समोर येईल. सटाणा तालुक्यातील द्राक्षे बाजारात येण्यास सुरुवात झाली असून त्यास प्रति किलोस ११० रुपये दर मिळत आहे. आवक वाढल्यानंतर हे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील; परंतु त्यासाठी दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल. द्राक्षासाठी विविध प्रकारची औषधे, संजीवकांचा वापर केला जातो. त्यातील अनेक घटकांवर शासनाचे नियंत्रण नाही. काहींबाबत तर नियमही नाहीत. बहुतांश उत्पादक उधारीवर माल घेतात. यामुळे वितरक ज्यातून अधिक नफा मिळतो, ती औषधे माथी मारतात असा अनुभव आहे.

यवतमाळ येथे कीटकनाशके फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या नाशिकमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या अधिकृत व अनधिकृततेचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनाने नोंदणीकृत नसलेली पीकवाढ संजीवके व इतर उत्पादनांच्या विक्रीला प्रतिबंध केला आहे. या स्थितीत औषधविक्रेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे शासन यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांची विक्री करू देण्याची मागणी केली होती. यावरून बरेच काही लक्षात येते. खोत यांनी संबंधितांना खुष्कीचा मार्ग सांगून नंतर घुमजाव केले. राज्यात थॉमसन सीडलेस, सोनाका, माणिकचमन, शरद सिडलेस, जम्बो सिडलेस या वाणांची लागवड होते. त्यात थॉमसन सीडलेस द्राक्ष निर्यात होतात. निर्यातक्षम द्राक्षांसाठी मण्यांचा आकारविहित निकषापर्यंत नेण्यासाठी संजीवके द्यावी लागतात. इतरही घटकांचा वापर केला जातो. अतिशय महागडय़ा औषधांचा वापर केला जातो. औषधांच्या मात्रेत कमी-अधिक प्रमाण झाल्यास निर्यात रद्द होण्याचा धोका असतो. वातावरणात बदल झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणी करावी लागते. या वर्षी जिल्ह्य़ात सुमारे दोन लाख एकर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड झाल्याचा द्राक्ष बागायतदार संघटनेचा अंदाज आहे. यावरून औषधे व पीकवाढ संजीवकांच्या प्रचंड बाजारपेठेचा अंदाज येईल.

वर्षभर लागणारी औषधे बहुतांश उत्पादक उधारीवर घेतात. या वेळी विक्रेते त्यांची कोंडी करत असल्याची बाब द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी कथन केली. संशोधकाने लिहून दिलेली औषधेविक्रेता दुकानात बदलतो. अनेक औषधांवर वेष्टनही नसते. काही घटकांसाठी नियमावली व निकषही नाहीत. अधिक नफेखोरीसाठी नोंदणीकृत नसलेली औषधे व संजीवके माथी मारली जातात. उधारीवर माल घ्यायचा असल्याने उत्पादकाकडे अन्य पर्याय नसतो. वेष्टन नसलेली औषधे, विनानोंदणीकृत कारखान्यांवर आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची मागणी संघटनेने केंद्रीय कृषी सचिवांसमोर मांडला. सध्या सटाणा तालुक्यातून द्राक्ष बाजारात येण्यास सुरुवात झाली असून उर्वरित भागातील बागा सध्या फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत आहेत. त्यांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला. शेतांमध्ये पाणी भरून राहिले. कोवळ्या पानांवर डावणीचा प्रादुर्भाव होतो. सलग आठवडाभर पाऊस सुरू राहिल्याने औषध फवारणी करता आली नाही. चिखलात ट्रॅक्टर फसले. वातावरण कोरडे झाल्यावर किडीची तीव्रता वाढते. त्या वेळी नुकसान लक्षात येईल असे दिंडोरीचे उत्पादक धीरज तिवारी यांनी सांगितले. सटाणा तालुक्यात तयार झालेल्या मालास पावसाचा फटका बसल्याचे उत्पादकांनी सांगितले. या सर्वाचा परिणाम उत्पादन घटण्यात होणार आहे.

गतवर्षी दोन लाख ३२ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्या माध्यमातून सरकारला दोन हजार कोटींचे परकीय चलन प्राप्त झाले. या हंगामात द्राक्षाची निर्यात वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. कॅनडा, अमेरिका, न्युझीलंड यासह अन्य काही देशात निर्यातीसंबंधी सरकार पातळीवरून बोलणी सुरू आहे. उपरोक्त देशांची परवानगी मिळाल्यास निर्यातीला चालना मिळेल. देशाच्या एकूण उत्पादनापैकी केवळ पावणेपाच टक्के द्राक्षे निर्यात होतात. महाराष्ट्रात हे प्रमाण साधारणत: साडेसहा टक्के आहे. – जगन्नाथ खापरे (अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना)

सटाणा तालुक्यात लवकर तयार होणाऱ्या द्राक्षापैकी सुमारे ६० टक्के माल एकटय़ा बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो. या वर्षी बांगलादेशने द्राक्षाचा प्रति किलोचा ५१ रुपये भाव गृहीत धरून त्यावर १०० टक्के आयात शुल्क लावले आहे. यामुळे कोलकाता येथील व्यापारी ते आयात शुल्क, काढणी व वाहतुकीचा खर्च सर्वाची गोळाबेरीज करून बागेतून द्राक्ष खरेदीचा भाव निश्चित करतात. बांग्लादेशच्या आयात शुल्काचा परिणाम द्राक्षाचा भाव कमी होण्यात झाला आहे.  – खंडू शेवाळे (संचालक, द्राक्ष उत्पादक संघ)