नाशिकरोड रेल्वे स्थानकात दिव्यांगांसाठी कार्यान्वित करण्यात आलेले विशेष प्रसाधनगृह उद्घाटनानंतर चार दिवसांत बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दिव्यांगांना विशेष सुविधा देण्याच्या पंतप्रधानाच्या संकल्पनेची पूर्तता या माध्यमातून झाली होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने कोणतेही कारण न देता दिव्यांगांबरोबर सर्वसाधारण प्रसाधनगृहही बंद केले आहे. इतकेच नव्हे तर, रेल्वे राज्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी तातडीने सुरू केलेली सिंहस्थातील तिकीट खिडकी पुन्हा शोभेची बाहुली ठरली आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील चौथा फलाट, नवीन रेल्वे पादचारी पूल आणि याच फलाटावर दिव्यांगासाठी उभारलेल्या प्रसाधनगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. या दौऱ्यानिमित्त स्थानकाचे रूप प्रशासनाने बदलले. या दिवशी स्थानकावर आलेल्या प्रवाशांना सुखद धक्का बसला होता.

एरवी स्थानकावरील दुर्लक्षित सेवा सुरळीत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी खास उभारलेली, पण नंतर बंद राहिलेली तिकीट खिडकी तातडीने सुरू केली गेली.

पाच ते सहा संगणकावरून त्या दिवशी तिकीट वितरणाचे काम सुरू झाले. प्रसाधनगृह व पार्किंगच्या सशुल्क सेवा त्या दिवशी चक्क मोफत केल्या गेल्या. त्या आशयाचे फलक ठळकपणे लावण्यात आले. सिंहस्थात चवथ्या फलाटाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, कुंभमेळा उलटून गेल्यानंतरही तो सुरू होऊ शकला नव्हता. तो चकाचक करत मंत्री महोदयांच्या हस्ते या फलाटाचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी दिव्यांगांसाठी खास प्रसाधनगृहाचेही उद्घाटन झाले.

मंत्री महोदयांचा दौरा संपुष्टात आला आणि रेल्वे स्थानक पुन्हा ‘जैसे थे’ अवस्थेत आले. म्हणजे, दिव्यांगांच्या प्रसाधनगृहाला प्रशासनाने टाळे ठोकले. सर्वसामान्यांसाठी नव्याने उभारलेल्या प्रसाधनगृहाची हीच गत झाली. वास्तविक, चार क्रमांकाच्या फलाटावरून पॅसेंजर व काही शटल गाडय़ा जातात. या रेल्वेगाडय़ांनी प्रवास करणारे प्रवासी प्रामुख्याने गोरगरीब आहेत.

प्रसाधनगृह बंद असल्याने या प्रवाशांना दुसऱ्या फलाटावर धावपळ करणे क्रमप्राप्त ठरले आहे. प्रसाधनगृह खराब होऊ नये, म्हणून प्रशासनाने हा मार्ग शोधल्याची माहिती हमालांकडून देण्यात आली. तिकीट खिडकीची अवस्था वेगळी नव्हती. रविवारी या ठिकाणी पाच ते सहा संगणक होते. रेल्वेचे अनेक कर्मचारी होते. परंतु, शुक्रवारी या खिडकीत नावापुरता एक संगणक राहिला असून कर्मचारी अंतर्धान पावले आहेत. म्हणजे प्रवाशांना या ठिकाणी तिकीट मिळू शकणार नाही. रेल्वे मंत्र्यांसमोर देखावा करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यशैलीबद्दल प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.