‘मास्क’धारी सेना नगरसेवकांकडून भाजपवर टीका

शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. त्यामुळे काहीवेळ सभागृहात गदारोळ झाला. शिवसेना नगरसेवक तोंडावर ‘मास्क’ लावत पालिका सभागृहात दाखल झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही अस्वच्छता व कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याचे टीकास्त्र सोडले. आरोग्य विभागाच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

गेल्या काही दिवसांत शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घराघरांतील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था असली तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. अनेक इमारतींच्या तळघरात पाणी साचल्याने डासांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे. पालिकेमार्फत धूर फवारणी होत असली तरी त्यातही अनेक त्रुटी आहे. या सर्वाचे पडसाद बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. पालिकेत पुनस्र्थापना करण्यात आलेल्या आरोग्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयांच्या बिकट अवस्थेवर प्रकाश टाकला. वारंवार कचरा साचणारी ठिकाणे आरोग्य विभागाला ज्ञात आहे. त्यांची नियमित स्वच्छता करण्याकडे प्रशासन कानाडोळा करते. प्रशासन गंभीर विषयात काम करण्यास तयार नाही. आरोग्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ही सल व्यक्त केली होती. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आरोग्याचे प्रश्न बळावले, याकडे लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. साथीचे आजार पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सूचित करण्यात आले.

मास्कधारण करून कोंडीचा प्रयत्न

आरोग्याच्या स्थितीवर विरोधकांनी लक्षवेधी मांडली होती. या विषयावरून सभागृहात गदारोळ उडाला. साथीच्या वाढत्या आजाराकडे लक्ष वेधण्यासाठी सेनेचे नगरसेवक ‘मास्क’ परिधान करीत सभागृहात दाखल झाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी निव्वळ स्वच्छता मोहिमेचे सोपस्कार पार पडतात, असा आक्षेप नोंदविला गेला. ‘फोटोसेशन’ झाल्यावर या मोहिमांतून पुढे काही निष्पन्न होत नसल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला.