दोन आठवडय़ांपासून दडी मारणाऱ्या पावसाचे शनिवारी जिल्ह्य़ातील बहुतांश भागात जोरदार पुनरागमन झाल्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांत दिवसभर संततधार सुरू आहे. या तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी असे दृश्य पाहावयास मिळाले. पावसामुळे धरणांच्या जलसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. पावसाअभावी रखडलेली पेरणीची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

हवामानशास्त्र विभागाने या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज वर्तविला असला तरी जिल्ह्य़ात कमी-अधिक प्रमाणात त्याची प्रतीक्षा करावी लागली. मागील आठवडय़ात नाशिकसह परिसरात अतिवृष्टी झाली, परंतु बहुतांश ग्रामीण भाग कोरडा राहिला होता. पावसाने दडी मारल्याने ८० टक्के क्षेत्रावरील पेरणी अद्याप झालेली नाही. या स्थितीत शनिवारी जिल्ह्य़ातील बहुतांश भागात पावसाचे जोरदार आगमन झाले. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १५७ मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर १२०, सुरगाणा ७४, पेठ ६२, नाशिक ४२, सिन्नर २४, कळवण १६, दिंडोरी १३, देवळा व निफाड प्रत्येकी ८ मिलिमीटर अशी नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. येवला, बागलाण तालुक्यांत तो रिमझिम स्वरूपात होता. नांदगाव, चांदवड व मालेगाव तालुक्यांत त्याने हजेरी लावली नाही. सहा तालुक्यांत सकाळपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता. संततधार सुरू असल्याने पेरणीसाठी तो लाभदायक ठरणार आहे. पावसाने दडी मारल्याने आजवर जिल्ह्य़ात केवळ १९.५ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे झाली आहेत. पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. या पिकांना जीवदान मिळणार आहे. उर्वरित ८० टक्के क्षेत्रावरील रखडलेली पेरणीची कामे मार्गी लागण्यास या पावसाने हातभार लागणार आहे. काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाने धरणांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.