देशातील हिंदू- मुस्लिम स्वत:हून आपापसात भांडत नाहीत, काहीजणांकडून स्वार्थासाठी त्यांच्यात भांडणे लावून दिली जातात, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले. त्या शनिवारी बिहारमधील जलालपूर येथील प्रचारसभेत बोलत होत्या. दादरी प्रकरणानंतर मौन सोडताना नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा धागा पकडत सोनियांनी हे वक्तव्य केले. नरेंद्र मोदी म्हणतात की, हिंदू-मुस्लिमांनी भांडू नये. मात्र, माझे म्हणणे असे आहे की, ते स्वत:हून भांडत नाहीत तर त्यांच्यात भांडणे लावली जातात. जेव्हा देशातील धार्मिक राजकारण संपुष्टात येईल तेव्हा काहीजणांना आपला गाशा गुंडाळावा लागेल, असा टोला सोनिया गांधींनी यावेळी भाजपला लगावला. याशिवाय, सोनिया गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही सरकारवर टीका केली. तुमचे सरकार ज्यांच्या इशाऱ्यावर चालते त्या व्यक्तीने आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जनता चिंतीत असल्याचे सोनियांनी यावेळी म्हटले.