सातपूर येथील मायलेक हत्याकांडातील मुख्य संशयितास अवघ्या चोवीस तासांत गजाआड करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे. या प्रकरणी घर मालकाच्या मुलास अटक करण्यात आली
रामदास रंगनाथ शिंदे (२७) याला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी उशिराने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
रविवारी रात्री सातपूर परिसरातील शिवाजीनगरच्या कार्बन नाका भागातील घरात कचरू संसारे यांची पत्नी पल्लवी व मुलगा विशाल यांचा डोक्यात मुसळी घालत तसेच हत्याराने वार करत हत्या करण्यात आली. संसारे सकाळी कामावरून परत आल्यानंतर हत्याकांड उघडकीस आले.
पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर कचरू संसारे, घरमालक रंगनाथ शिंदे व त्यांची मुले, संसारे यांचा भाचा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत घरमालक शिंदे यांचा मोठा मुलगा रामदास (२७) फरार असल्याचे लक्षात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि मिळालेल्या माहितीनुसार रामदासवरील पोलिसांचा संशय बळकट झाला.
मंगळवारी सकाळी सातपूर पोलिसांनी फरार रामदासला शोधण्यात यश मिळविले. रामदासने आपणच हत्या केल्याची कबुली दिली.
रविवारी रात्री कचरू संसारे कामावर गेल्यानंतर घरात प्रवेश केलेल्या रामदासने कचरू यांची पत्नी पल्लवीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी विरोध करताच संतप्त रामदासने पल्लवीच्या डोक्यात मुसळीने वार केला. तिच्या शरीरावर हत्याराने वार केले.
या झटापटीत लहानगा विशाल अडथळा ठरत असल्याने त्याचीही हत्या केल्याचे रामदासने पोलिसांना सांगितले.