इगतपुरीतील मिस्टिक व्हॅलीमध्ये उच्चभ्रू परिवारातील मुलं दारू पिऊन बारबालांसह धिंगाणा घालत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. बारबालांवर नोटांची उधळण करत अश्लील चाळे करणाऱ्या १३ तरूण-तरुणींना पोलिसांनी अटक केली. ही डिस्को पार्टी रविवारी (दि. २६) रात्री सुरू होती. याप्रकरणी १० बारबालांना देखील अटक करण्यात आली आहे. डिस्को पार्टीत पकडण्यात आलेले हे तरुण प्रशासनातील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अल्कोहोल आणि ड्रगचे सेवन केल्यामुळे या तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या आरोपींना तातडीने जामीनही देण्यात आला आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे हे नातेवाईक आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

महामार्ग परिसरात मिस्टिक व्हॅली हे रिसोर्ट आहे. या रिसोर्टमधून नाच गाण्यांचा आवाज येत असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना रात्री दहा वाजेच्या सुमारास मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांनी कर्मचाऱ्यांचे खास पथक घेत मिस्टिक व्हॅलीवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच डिस्कोवर नाच करणाऱ्या तरुण – तरुणींच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळत पोलिस ठाण्यात आणले.

पृथ्वीराज युवराज पवार, सुमित श्रीराम देवरे, कौस्तुभ विश्वास जाधव, सुंशात जिभाऊ गांगुर्डे, ललित सुनील पाटील, शब्बीर आजीमखान या अटक करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. पैकी ललित पाटील हा पिंपरी चिंचवडचा तर शब्बीर, आजीमखान हा ठाण्यातील काशिमिरा येथील आहे. उर्वरित सर्व जण नाशिकमधील आहेत. तर बारबाला मुंबईतील आहेत. ही डिस्को पार्टी सांताक्रूज येथील धमेंद्रकुमार दिनेशकुमार सिंग याने आयोजित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.