जवळपास दोन वर्षे जेमतेम प्रवाहाची साथ करणाऱ्या आणि यंदाच्या पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहिलेल्या गोदावरीला गंगापूर धरण ७५ टक्के भरल्यामुळे पुढील काळात पावसानंतर पूर स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. २००८ मधील महापुरावेळी शहरवासीय अक्षरश: वाऱ्यावर सोडले गेल्याचा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी धरणातून पाणी न सोडता गोदावरी दुथडी भरून वाहिली होती. या एकंदर स्थितीत यंत्रणांसह नागरिकांनी सजगता बाळगण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली नव्हती. यंदा मात्र संततधारेमुळे गंगापूर धरण जुलै महिन्यातच ७५ टक्के भरलेले आहे. पावसाळ्यात कोणत्या महिन्यात धरण किती टक्के भरलेले असावे याचे काही निकष आहेत. त्यानुसार पुढील काही दिवसात पाऊस झाल्यास त्याचे पाणी धरणात साठविता येणार नाही. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंगापूरचे दरवाजे प्रथमच उघडणे क्रमप्राप्त ठरणार आहे. शहरातून वाहणाऱ्या गोदावरीला पावसाळ्यात पूर आला नाही, असे अपवादात्मक कालावधीवगळता फारसे कधी घडलेले नाही. गंगापूर धरणाचे दरवाजे २०१४ मध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उघडण्यात आले होते. त्यावेळी अनुक्रमे ११ हजार व ९१७६ क्युसेस पाणी सोडण्यात आले. मागील हंगामात पावसाअभावी पाणी सोडण्याची वेळ आली नव्हती. यंदा मात्र गंगापूरमधून पाणी सोडण्याची वेळ लवकर येणार असल्याचे दिसत आहे.

३ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी गोदावरी दुथडी भरून वाहिली. धरणा खालील भागातील पावसाचे ते पाणी होते. आता पाऊस झाल्यास धरणातील पाण्याचीही त्यात भर पडेल. गेल्या काही वर्षांत अतिक्रमणे, मातीचा भराव टाकणे, चुकीच्या पद्धतीने पुलांची बांधणी, पात्रातील कॉँक्रीटीकरण यामुळे गोदावरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने गोदावरी दुथडी भरून वाहते. २००८ मध्ये गोदावरीच्या महापुरामुळे शहर व परिसरास बिकट स्थितीला तोंड द्यावे लागले होते. गंगापूर धरणातून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे शहरात पाणी शिरल्याचा आरोप त्यावेळी पालिकेच्या धुरिणांनी केला होता. परंतु, महापुराच्या चौकशीत पूररेषेतील बांधकामे आणि त्या संदर्भातील धोरणाबाबत दाखविलेली अनास्था कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला गेला. पुढील काळात रडतखडत गोदावरीसह उपनद्यांच्या पूररेषा आखणीचे काम पूर्णत्वास गेले. तरी देखील गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह सुरक्षित राखण्याचा उद्देश सफल झाला नाही. सिंहस्थात खुद्द पाटबंधारे विभागाने गोदावरीत नव्या घाटांची बांधणी करत त्यात नव्याने भर घातली.

ही एकंदर स्थिती लक्षात घेतल्यास पुढील दोन महिन्यांत सर्व पातळीवर दक्षता बाळगणे अनिवार्य ठरणार आहे. २००८ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गंगापूरमधून ४२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता. त्या दिवशी संपूर्ण शहराला महापुराचा तडाखा सहन करावा लागला. धरणातून सोडले जाणारे पाणी आणि शहर परिसरातील पावसाचे पाणी गोदावरीत एकत्र आल्यावर एकूण  प्रमाण लक्षणिय वाढते. विविध कारणांस्तव वहन क्षमता घटल्याने हे पाणी मग पात्राबाहेर पडते आणि काठावर जिकडे मार्ग सापडेल तिकडे शिरते. हे टाळायचे असल्यास शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाची खरी गरज आहे.

पहिल्याच मुसळधार पावसात धरणातून पाणी न सोडता पात्रातून सुमारे २२ हजार क्युसेक्स पाणी वाहिल्याने गोदावरीला पूर आल्याचा बहुतेकांचा समज झाला. गोदा काठावरील वाहने पाण्यात वाहून गेल्याचे दृश्य पाहून शहरवासीयांनाही काहीसे तसेच वाटले. तथापि, तेव्हाच्या पावसात दुथडी भरून वाहिलेली गोदावरीच पूरस्थिती दर्शवत असल्यास ७५ टक्के भरल्यामुळे गंगापूर धरणातून आता पावसानंतर पाणी सोडल्यावर काय होईल? गोदाकाठावर वसलेल्या नाशिकला कोणत्या स्थितीला तोंड द्यावे लागेल? त्याचे गांभीर्य शासकीय यंत्रणांनी लक्षात घेण्याची गरज आहे. २००८ मध्ये गोदावरीच्या महापुराचे खापर जिल्हा प्रशासन, महापालिका व पाटबंधारे विभागाने परस्परांवर फोडण्यात धन्यता मानल्याचा ताजा इतिहास आहे. यंदा तसे घडू नये यासाठी कागदोपत्री सज्ज असणाऱ्या आपत्ती नियंत्रण विभागाला दक्षता घेण्याबरोबर समन्वय साधण्याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

संभाव्य पूर नियंत्रणाची तयारीखास

पूर नियंत्रणाच्या कामात पारदर्शकता आणण्याबरोबर नागरिकांनाही सजग राखण्याच्या दृिष्टकोनातून गोदावरी खोऱ्यातील पूर पूर्वानुमानासाठी पाटबंधारे विभागाची अत्याधुनिक व्यवस्था कार्यान्वित आहे. या यंत्रणेद्वारे कोणत्याही धरणातील जल पातळीबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याची पातळीही १५ ते ३० मिनिटांगणिक भ्रमणध्वनीवर मिळू शकते. तसेच गोदावरी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात स्वयंचलित र्पजन्यमापक यंत्रणा बसवून पूर नियंत्रणात काटेकोरपणा आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गोदावरी खोरे पूर प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात तब्बल चार कोटी रुपये खर्चून ही व्यवस्था उभारण्यात आली. २००८ मधील महापूरानंतर धरणांमधून पाणी सोडण्याचे दायित्व ज्या घटकावर आहे, त्या पाटबंधारे विभागाने गोदावरी खोऱ्यात पुरामुळे आपत्कालीन संकटांचा सामना करावा लागू नये यासाठी चार वर्षांपूर्वी कार्यान्वित केलेल्या यंत्रणेची यंदाच्या पावसाळ्यापूर्वी चाचपणी करण्यात आली. त्या अंतर्गत संपूर्ण खोऱ्यातील धरणांवर स्वयंचलित पाणी पातळीदर्शक यंत्रणा, पर्जन्यमापक केंद्र तर नद्यांमध्ये पाणी प्रवाहाच्या मोजमापासाठी सरिता मापन केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. अ‍ॅक्वास्कॅन पद्धतीच्या उपकरणांद्वारे स्वयंचलित पद्धतीने संकलित झालेली माहिती उपग्रहाच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या मुख्यालयात नियंत्रण कक्षास मिळते. ‘रिअर टाईम’ तत्त्वावर ही माहिती मिळणार असल्याने धरणातून पाणी सोडताना त्याचा मुख्यत्वे उपयोग होईल. या यंत्रणेद्वारे प्रत्येक धरणात पुढील काही तासात येणाऱ्या पावसाच्या पाण्याची माहिती चार ते वीस तास आधीच समजते. त्यामुळे धरणांतून आवश्यक तेवढा पाण्याचा विसर्ग नदीत सोडणे शक्य होईल आणि संभाव्य पुराने नदीकाठावर कमीतकमी हानी होईल याची दक्षता घेता येणार आहे.

गंगापूर प्रकल्प समूहातील काश्यपी, आळंदी, गंगापूर, गौतमी-गोदावरी तर दारणा प्रकल्प समूहातील भावली, मुकणे, कडवा, भोजापूर, दारणा, वालदेवी या धरणांमध्ये जलाशय पातळीदर्शक उपकरणे बसविण्यात आली आहेत. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, वाघेरा, अंजनेरी, घोटी अशा एकूण १९ ठिकाणी स्वयंचलीत र्पजन्यमापन केंद्र कार्यान्वित आहेत. नदीच्या पातळीची माहिती घेण्याकरिता आळंदी नदीवर जलालपूर शिवारात, गोदावरी नदीवर होळकर पूल, किकवी नदीवर बेजे, वक्तीनदीवर हिरडी गावांजवळ, वाकी नदीवर धरणाच्या खालील बाजूस आणि दारणा नदीवर नाशिक-सिन्नर रस्त्यावरील पूल येथे सरिता मापन केंद्र बसविलेली आहेत. माहिती संकलनाचे काम नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षात केले जाते. पावसाळ्यात पुराच्या धास्तीत राहणाऱ्या नागरिकांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यावर ही माहिती दूरध्वनीच्या माध्यमातून मिळू शकते.

अतिदुर्गम भागातील माहिती संकलीत करण्यास अडचणी येत असल्याने आणि ती माहिती विलंबाने प्राप्त होत असल्याने पूर नियंत्रणासाठी धरणांच्या दरवाजांचे परिचालन करणे, पूरप्रभावित गावांना सूचना देणे या कामांना विलंब होत असल्याचे लक्षात आले होते. या नव्या उपकरणांच्या माध्यमातून ही त्रुटी भरून काढण्यात आली. प्रत्येक तासाची वा अर्धा तासाची माहिती संकलीत करून ती नियंत्रण कक्षास स्वयंचलित पद्धतीने देण्याची या उपकरणांची क्षमता आहे. गंगापूर धरणाच्या खालील भागात वास्तव्यास असणाऱ्या नाशिककरांसाठी पावसाळ्यात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूर धरणात पुढील काही तासात किती पाणी येणार आहे, त्यामुळे धरणातून सोडावे लागणारे पाणी, गोदावरीच्या पाणी पातळीत होणारी वाढ अशी संपूर्ण माहिती प्रत्येक तासाला उपलब्ध होईल.