अंबडमधील प्रकरणात सहा संशयितांपैकी एकाला पोलीस कोठडी

अंबडमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेत  संशयित व त्याच्या साथीदारांची कार्यशैली लक्षात घेता पीडितेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षणाची गरज व्यक्त होत आहे. या घटनेने शालेय विद्यार्थ्यांमधील वाढती गुन्हेगारी वृत्ती समोर आली.

संशयितांनी महिनाभराहून अधिक काळ ही बाब उघड होऊ नये, म्हणून पीडित शाळकरी मुलीवर दबाव टाकला. तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली. संशयितांकडून होणारी छेडछाड व धमक्यांचा त्रास अन्य काहीजणींना सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे. दिवाळीच्या काळात अत्याचाराची ही घटना घडली. तेव्हापासून संशयितांनी हरतऱ्हेने धमकावत पीडितेला गप्प बसण्यास भाग पाडले. पीडितेच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच अल्पवयीन आणि एक महाविद्यालयीन अशा सहा संशयितांना अटक केली. त्यापैकी एका संशयिताची ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

अंबड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या अश्विननगरमधील रो हाऊस येथे ही घटना घडली. पीडित मुलगी आणि काही संशयित हे एकाच शाळेत वेगवेगळ्या इयत्तेत शिक्षण घेतात. शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपद्वारे संशयितांनी पीडितेशी ओळख केली. या ओळखीचा गैरफायदा त्यांनी घेतला. सप्टेंबर महिन्यात दुपारी पीडिता वही घेऊन निघाली होती. यावेळी ग्रुपवरील ओळखीच्या मित्राने तिला घरी नेले. तिला गुंगीचे औषध पाजले आणि वरील खोलीत नेऊन आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने हादरलेल्या पीडितेला संशयितांनी याबाबत वाच्यता केल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकून दुखापत करण्याची धमकी दिली. दिवाळीच्या सुटीनंतर शाळा सुरू झाल्यावर संशयित व त्यांच्या साथीदारांकडून पीडितेला धमकावणे सुरू राहिले. खचलेल्या मुलीने घरी काही सांगितले नाही. पीडितेच्या त्रासाची आईला जाणीव झाली. कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी कुटुंबीयांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चक्रे फिरवत सर्व संशयितांना अटक केली. त्यातील पाच संशयित अल्पवयीन तर एक किशन जयप्रकाश जागट (२१, अक्षय अपार्टमेंट, संभाजी स्टेडियमजवळ) तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सोमवारी संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

संशयितांच्या धमक्यांचा त्रास अन्य काही मुलींनाही सहन करावा लागल्याचे सांगितले जाते. आपण मौन बाळगले तर आणखी त्रास दिला जाईल, याची जाणीव संबंधितांना झाली. त्यातून पीडितेने तक्रार देण्याचे धाडस दाखविले. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून संशयितांनी महिनाभर पीडितेला धमकावले. नातेवाईकाला मारण्याची धमकी दिली. या घटनाक्रमात संशयितांना साहाय्य करणाऱ्या साथीदारांचा छडा लावण्याची मागणी होत आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी संशयितांकडून अन्य कोणा मुलींना तसा जाच झाला नसल्याचे सांगण्यात आले.

पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे -आ. सीमा हिरे

सिडकोसह शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर मुलींची छेडछाड, टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच सामूहिक बलात्काराच्या घटनेची तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी आ. सीमा हिरे यांनी पोलिसांकडे केली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, आ. हिरे यांनी पीडितेसह कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात गुन्हा दाखल करू नये म्हणून पीडितेला धमकावले गेले. तिच्यासह तिच्या कुटुंबीयांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. संबंधितांना पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली. संशयितांनी समाज माध्यमांचा गैरवापर केला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यासाठी तातडीने तपास पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. सिडकोसह शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयात टवाळखोरांचा वावर असतो. संबंधितांकडून मुलींची छेडछाड केली जाते. टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलिसांनी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत गस्त ठेवावी, अशी मागणी आ. हिरे यांनी केली. पीडित कुटुंबीयांस त्यांनी धीर दिला. पुन्हा कोणी दबाव आणण्याचा वा धमकावण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबाने तातडीने संपर्क साधावा. भाजपचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून येतील, असे सांगण्यात आल्याचे हिरे यांनी सांगितले.