ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन
भारतीय संस्कृती प्राचीनतम असून भारतातील विविध विद्यापीठांमध्ये या संस्कृतीचा अभ्यास झाला पाहिजे. ज्ञानाधिष्ठित व संस्कारक्षम असल्यानेच जगात भारतीय संस्कृती टिकली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले आहे.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित महाविद्यालयीन स्तरावरील प्रथम पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांच्या सामर्थ्यांने एकविसाव्या शतकात भारत माहिती, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात प्रगत होत असून हे शतक भारताचे आहे. भारत जगतगुरू होईल, असा विश्वासही डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. या वेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना संस्कार विसरू नका, असा सल्ला दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. या वेळी विद्यापीठात विशेष गुणवत्ताप्राप्त संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधील स्नातकांना डॉ. भटकर यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर संस्था संचालकांसह पदाधिकारी व शिक्षण अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन परीक्षा विभागप्रमुख डॉ. प्रमिला भामरे, प्रा. सुरेश जाधव यांनी केले. आभार सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी मानले.