२२ प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत मतैक्य

महापालिका निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपने आपल्या ७०० इच्छुकांच्या मुलाखतीचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आता इतर राजकीय पक्षांनी खडबडून जागे होत त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. उमेदवार निवडीसाठी शिवसेना व मनसे पुढील आठवडय़ात मुलाखती घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात दोन्ही पक्ष सर्व जागांवर मुलाखती घेणार आहेत. २० ते २२ प्रभागात आघाडी होण्याबाबत मतैक्य असले तरी चार ते पाच प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वाद आहे. त्यावर तोडगा न निघाल्यास सर्व जागा स्वबळावर अन्यथा उपरोक्त प्रभागात मैत्रीपूर्ण लढती होतील असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर राजकीय पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. महापालिकेतील सत्ताधारी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपापल्यापरीने तयारी केली. योग्य उमेदवार शोधण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मुलाखतीचा मार्ग अनुसरला आहे. ही प्रक्रिया इतर राजकीय पक्षांच्या आधी भाजपने पूर्णत्वास नेली. १४ जणांच्या निवड समितीने तीन दिवसात १२२ प्रभागातील ७०० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीचे मूल्यमापन आणि प्रत्येक प्रभागातील सर्वेक्षण याद्वारे भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. शिवसेनेत इच्छुकांची संख्या भाजपसारखीच आहे. परंतु, या पक्षाने मुलाखतीसाठी घाई दाखविलेली नाही. पुढील आठवडय़ात ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुलाखत प्रक्रियेसाठी निवड मंडळाची निश्चिती झालेली नाही. ज्या पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्या पक्षांकडून उमेदवारांची यादी अंतिम क्षणी जाहीर केली जाईल. आधी यादी जाहीर केल्यास बंडखोरी उफाळून येईल, अशी धास्ती संबंधित पक्षांना वाटते. काँग्रेस व राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीसाठी मुलाखतीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू असली तरी काही प्रभागांमध्ये मतभेद आहेत. ३१ पैकी २२ प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे आघाडीबाबत मतैक्य आहे. परंतु, चार ते पाच प्रभागांमध्ये वाद असून तो सोडविण्यासाठी चर्चा केली जात आहे. या स्थितीत वेळ पडल्यास सर्व प्रभागात स्वबळावर अन्यथा मतभेद असणाऱ्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होईल, असे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी नमूद केले.

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी एकूण २२८ अर्ज इच्छुकांनी नेले. त्यातील आतापर्यंत १३८ अर्ज प्राप्त झाले असून इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. मुलाखतीचा अहवाल २७ जानेवारी रोजी राज्य निवड मंडळासमोर ठेवला जाईल. ज्या ठिकाणी मतभेद नाहीत, त्या प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे आहेर यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीबाबत कोणतेही मतप्रदर्शन न करता इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला. २१ व २२ जानेवारी या कालावधीत प्रभागनिहाय मुलाखती राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी पंचवटी, सिडको, सातपूर विभागातील प्रभाग तर दुसऱ्या दिवशी पश्चिम व नाशिकरोड विभागातील इच्छुकांच्या मुलाखती होतील.

मनसेच्या वतीने पुढील आठवडय़ात मुलाखती घेतल्या जाणार असून त्याचे वेळापत्रक तयार केले जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने उमेदवार निवडीसाठी लेखी व तोंडी अशा दोन स्वरूपात परीक्षा घेतल्या होत्या. राज ठाकरे यांनी यंदा लेखी परीक्षा घेतली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे इच्छुकांना केवळ तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे.