दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन

पाकिस्तानकडून सिमेवर होणाऱ्या कारवाया, उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट, राज्यातील सिंचनात न झालेली वाढ, बांग्लादेशी घुसखोरांची समस्या अशा विविध विषयांना स्पर्श करत त्याअनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान सोडले. रविवारी येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधीं शिबीरास मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी महाराष्ट्राला दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राजकारण न करता सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

येथील गंगापूर रस्त्याजवळील चोपडा बँक्वेट सभागृहात आयोजित शिबीराचा समारोप ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने झाला. महाराष्ट्रभर शिवसेना सहा विभागीय शिबीर घेणार असून त्याची सुरूवात नाशिकपासून झाली. केवळ दुसऱ्याचा व्देष करून मत मिळणार नसल्याने निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी जनतेची कामे करण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिला. सिमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांमध्ये भारतीय सैनिक मारले जाण्याचे प्रकार घडल्यानंतर बदला घेण्याची भाषा केली जाते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नाही. पूर्वीच्या सरकारपेक्षा हे सरकार काही वेगळे करणार नसेल तर काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यापासून शिवसेना तसूभरही हटणार नसल्याचे स्पष्ट केले. हिंदुत्वाचा धागा पकडत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व मुद्दे आपणास मान्य असून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. जोपर्यंत पाकिस्तान सिमेवरील तसेच दहशतवादी कारवाया थांबवित नाही तोपर्यंत त्यांच्या देशातील कलाकारांचे कार्यक्रम, क्रिकेट सामने भारतात होऊ न देण्यासाठी सर्वाची एकजूट होणे आवश्यक आहे. परंतु, तसे होत नसल्याचा फायदा पाकिस्तान घेत आहे. बांग्लादेशी घुसखोरांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असून सिमेवर शत्रुचा सामना करता येईल, परंतु देशातील या घुसखोरांचे आव्हान अधिक असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.

केंद्र सरकार राष्ट्रपतींचा दुरूपयोग करत असून छोटय़ा राज्यांची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला पुन्हा लक्ष केले. मराठवाडय़ातील बियर कंपन्यांच्या पाणीपुरवठय़ासंदर्भात आपण मांडलेला विषयच नंतर न्यायालयाने मांडला. ज्या शरद पवारांचा सल्ला हे सरकार मानते ते पवारच राज्यात दीड वर्षांत एक टक्काही सिंचन झाले नसल्याचा आरोप करत असल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. शेतकरी महिलादेखील आता आत्महत्या करू लागल्या असून या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसैनिकांनी गावांगावांमध्ये घरोघरी जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शिबीरात तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले. उपनेते गुलाबराव पाटील यांनी ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा व उपाययोजना’ मांडल्या. रवींद्र मिर्लेकर यांनी ‘संघटना बांधणी’ चा आढावा घेतला. नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘शिवराय ते शिवसेनाप्रमुख’, अभिजीत घोरपडे यांचे ‘पाणीप्रश्न व उपाययोजना’ ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचे शिवसेना व समाज यांच्या नात्यावर भाषण झाले. यावेळी राजेंद्र जाधव लिखीत ‘नारपार दमणगंगेतून समृध्दीकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सूत्रसंचालन महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले. आभार खा. हेमंत गोडसे यांनी मानले. सभागृहाच्या प्रांगणात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील स्मृतीस्थळाच्या धर्तीवर शक्तीस्थळ उभारण्यात आले होते. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्य़ांचे सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच लोकप्रतिनिधी शिबीरास उपस्थित होते.