अडीच ते तीन वर्षांत गुंतवणूक दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती यांना तब्बल दोन वर्षांनंतर अटक झाल्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे बाहेर येण्यास मदत होणार आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागाकडे असणारा तपास नाशिक शहर पोलिसांकडे सुपूर्द झाला. सिंगापूर येथे फरार झालेल्या भाऊसाहेबाला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणेकडून प्रयत्न सुरू होते; परंतु दोन वर्षे दाद न देणारा भाऊसाहेब अचानक भारतात कसा आला हे कोडे मात्र कायम आहे.
भाऊसाहेब पत्नीसह भारतात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी नाशिक पोलिसांनी मुंबई विमानतळावर त्यांना अटक केली. लगोलग दुपारी त्यांना नाशिक येथे आणण्यात आले. यानिमित्ताने अडीच वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसीच्या म्होरक्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. सर्वसामान्यांमधील झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेचा केबीसीच्या संचालकांनी फायदा घेतला. अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे या कंपनीने असे गारूड केले की, त्या मोहजालात राज्यातील हजारो गुंतवणूकदार अडकले. भाऊसाहेब चव्हाणने ‘केबीसी’ कंपनीची स्थापना केली होती. या घोटाळ्याचा तोच मुख्य सूत्रधार. पत्नी आरती, भाऊ बापूसाहेब, शालक संजय जगताप (निलंबित पोलीस कर्मचारी) अशा निकटच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याने विविध भ्रामक साखळी योजनांद्वारे गुंतवणूकदारांना करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखविले. ठिकठिकाणी दलाल नेमून आणि भव्यदिव्य मेळाव्यांचे आयोजन करत केबीसीने आपल्या योजनांच्या जाळ्यात सर्वसामान्यांना ओढण्याचे काम केले. या भ्रामक योजनांमध्ये फसवणूक झाल्याची साशंकता आल्यावर जुलै २०१४ मध्ये पहिली तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर हजारो गुंतवणूकदार पुढे आल्यामुळे या गुन्हय़ाची व्याप्ती किती मोठी आहे ते अधोरेखित झाले.
आठ हजार तक्रारदारांनी नाशिक जिल्हय़ात तक्रारी दिल्या असून संबंधितांची फसवणूक झालेली रक्कम २१० कोटींच्या घरात आहे. राज्यातील इतर भागांतही केबीसीच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. केबीसी कंपनीच्या घोटाळ्यात नाडल्या गेलेल्यांचा आकडा वाढल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या प्रकरणी केबीसीचा संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक पंकज शिंदे, कर्मचारी नितीन शिंदे, मुख्य संशयिताचा शालक निलंबित पोलीस संजय जगताप, संशयिताचा भाऊ नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण, भारती शिलेदार व कौसल्या जगताप या आठ जणांना अटक केली गेली.
केबीसीच्या संचालकांची सुमारे ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम जप्त करण्यात आली. भाऊसाहेब व पत्नी वगळता उर्वरित संशयित कारागृहात आहेत. या घोटाळ्यात नाडल्या गेलेल्या माय-लेकासह सहा ते सात जणांनी आत्महत्या केली, तर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुन्हा दाखल होण्याआधी भाऊसाहेब पत्नीसह सिंगापूरला पसार झाला होता. त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली गेली; परंतु त्यास यश मिळत नव्हते. ही प्रक्रिया रेंगाळली असताना शुक्रवारी भाऊसाहेब भारतात येणार असल्याची माहिती यंत्रणेला मिळाली. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या पथकाने मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेतले.

आमिषांचा बाजार
गुंतवणूकदारांआधी केबीसीने दलालांना विविध आमिषे दाखविली. दलालांना आकर्षक टक्केवारी, लॅपटॉप, एक लाखाचे दागिने, परदेश प्रवास, ७५६ ग्राहक मिळविल्यास ५० हजार रुपये महिना वेतन, अडीच हजार ग्राहक केल्यास आलिशान मोटार आदी आमिषे दाखविली गेली. केबीसी कंपनी परकीय चलनात गुंतवणूक करते. त्यातून होणाऱ्या व्यवहारातून छोटय़ामोठय़ा चढ-उतारात नफा कमावला जातो. त्यामुळे अडीच ते तीन वर्षांत कंपनी गुंतवणुकीवर तिप्पट रक्कम देऊ शकते, असा प्रचार केला गेला. परदेशवारी केलेले आणि किमती भेटवस्तू पदरात पडलेले दलाल केबीसीचे ‘स्टार प्रचारक’ बनले. इतरांचे ते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न होता. स्थानिक पातळीवर नित्य संपर्कातील दलाल आणि कंपनीचा बडेजाव पाहून सर्वाचे भान हरपले आणि गुंतवणुकीची आकडेवारी दिवसागणिक वाढत गेली. गुन्हा दाखल झाल्यावर नाडल्या गेलेल्यांच्या आकडेवारीने दलालांच्या कामाची साक्ष दिली.