आडगाव पोलिसांची कामगिरी

अल्पवयीन बालकाचे अपहरण करून मध्यप्रदेशमध्ये परांगदा झालेल्या संशयिताला जेरबंद करतानाच अपहृत बालकाची सुखरुप सुटका करण्यात आडगाव पोलिसांना यश आले. भ्रमणध्वनीही नसल्याने संशयिताचा माग काढणे आव्हान ठरले. या स्थितीत पोलिसांनी होशंगाबाद येथून अपहृत बालकाची सुटका करत त्यास पालकांच्या स्वाधीन केले. किरकोळ कारणातून झालेल्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने संशयिताने मित्राच्या मुलाचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.

२८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अपहरणाची ही घटना घडली होती. औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी लॉन्ससमोर विनोद गायकवाड हे राहतात. मोलमजुरी करणाऱ्या गायकवाड कुटुंबाची ओळख कुंभमेळ्यात काम शोधण्यासाठी आलेल्या विष्णू विजयसिंह चौहाण (२५) याच्याशी झाली होती. गायकवाड कुटुंबियांनी काम नसल्याने त्याला घरातच राहण्यास जागा दिली.  या काळात विनोद आणि विष्णू हे एकाच ठिकाणी कामावर जात. गायकवाड दाम्पत्याच्या मुलांनाही विष्णूचा लळा लागला. कालांतराने कुटुंबास हातभार लावण्याच्या कारणावरून विनोद आणि विष्णू यांच्यात वाद झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी विष्णूने गायकवाड यांचा सहा वर्षीय मुलगा अनीलचे अपहरण केले. पतंग घेऊन देतो असे सांगून संशयित रिक्षातून त्याला घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गेला. तिथून तो मध्यप्रदेशात निघून गेला. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

अखेरीस आडगाव पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयिताची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, गायकवाड कुटुंबियांकडे विष्णू चौहाणची फारशी माहिती नव्हती. ज्या दिवशी गायकवाड व चौहाणमध्ये वाद झाले, तेव्हा तो होशंगाबाद येथे जाणार असल्याचे म्हटला होता. या व्यतिरिक्त संशयितांची फारशी माहिती मिळाली नाही. त्याच्याकडे भ्रमणध्वनी नसल्याने त्याचा माग काढणे अवघड बनले. यंत्रणेकडून संशयिताचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

याच सुमारास होशंगाबाद येथून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने पोलीस पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. या पथकाने होशंगाबादमधील मंदिरे, रेल्वे, बसस्थानक, अनाथालय व नर्मदा नदीचा परिसर पिंजून काढला. या दरम्यान खासगी बसस्थानकालगत संशयित बालकासमवेत आढळून आला. पोलिसांनी अपहृत अनीलची सुटका करत संशयिताला ताब्यात घेतले. या बाबतचा अहवाल होशंगाबाद पोलीस ठाण्यातही देण्यात आला. त्यानंतर बालकाला नाशिक येथे आणण्यात आले. अपहरण प्रकरणी संशयित विष्णू चौहाणला अटक करण्यात आली आहे.

गुरूवारी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या उपस्थितीत अनीलला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण यांच्यासह आडगाव पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित होते.