मद्यसेवन करताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाल्याची घटना सोमवारी दुपारी पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात घडली. अतिशय गजबजलेल्या परिसरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांचा धाक नसल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

शहर परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात पंचवटी परिसर नेहमी केंद्रस्थानी असतो. काही महिन्यांपूर्वी दोन गटांमधील वाद सोडविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी काटय़ा मारुती चौकीत मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दुसऱ्या गटाने थेट पोलीस चौकीत एका युवकावर हल्ला चढविण्यापर्यंत मजल मारली होती. या भागात टोळक्यांमधील वाद काही नवीन नसले तरी इतर भागही त्यास अपवाद नाहीत. सातपूर पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात थर्टी फर्स्टच्या रात्री अंतर्गत वादातून दोघांची हत्या झाल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला होता. सातपूर पोलिसांना त्याची कानोकान खबर नव्हती.

याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन ग्रुपचा सर्वेसर्वा भूषण लोंढेने अटकपूर्व जामीन मिळवत विवाह झाल्यानंतर पुन्हा गायब होण्याची करामत केली. राजाश्रयाने फोफावलेल्या गुन्हेगारी टोळ्यांमुळे काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांचे शहर अशी नाशिकची ओळख बनली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या काळात गुन्हेगारांवर वचक बसवून ही ओळख पुसण्यात यंत्रणेला यश आले होते. परंतु मागील काही महिन्यांत पोलिसांचा वचक राहिला नसल्याची सार्वत्रिक भावना आहे. त्याची परिणती टोळक्यांमधील वाद, खून, चोरी, अपहरण आदी घटनांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. यामुळे गुन्हेगारी घटनांचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे.

सोमवारचा दिवस पंचवटीकरांसाठी पुन्हा धक्कादायक ठरला. मालेगाव मोटार स्टँड चौकालगत पोलीस चौकीच्या मागील बाजूला देशी दारूचे दुकान आहे. या ठिकाणी दुपारी बारा वाजता सुनील प्रकाश बैरागी (३२, रा. सिडको) आणि गणेश पांडुरंग वायकुंडे (कालिकानगर, दिंडोरी रोड) हे मद्यपानासाठी आले होते. प्राथमिक माहितीनुसार मद्यपान करताना उभयतांमध्ये काही वादविवाद झाल्याचे सांगितले जाते. या वादामुळे बैरागी दुकानाबाहेर येऊन उभा राहिला. यावेळी वायकुंडेने लाकडी दांडक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. बेदम मारहाण केली. डोक्यावर जोरदार फटके बसल्याने बैरागी खाली कोसळला.

या ठिकाणी रक्ताचा अक्षरश: सडा पडला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची धावपळ उडाली. वर्मी घाव बसल्याने सुनील बैरागी याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन संशयित वायकुंडेला ताब्यात घेतले. बैरागी व वायकुंडे हे परस्परांना ओळखत असल्याचे सांगितले जाते. मद्यपानासाठी ते सोबत आले होते. त्यांच्यात नेमका कशावरून वाद झाला, याची स्पष्टता चौकशीअंती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.