विद्ध्वंस प्रवृत्तीने प्रेरित झालेली एक व्यक्ती कुंभमेळ्यात येते. येथील वातावरणाचा परिणाम होऊन ती सर्जनात्मकतेकडे वळतो, असा संदेश देणारा ‘कुंभमेळा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून धर्मशास्त्राची मनोरंजक सफर घडविण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक संदीप साळगांवकर यांनी येथे ‘लोकसत्ता’ला सांगितले.साळगांवकर्स इंटरटेन्मेंट हबच्यावतीने सध्या त्र्यंबकनगरीत कुंभमेळा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. त्र्यंबकच्या १० शैवपंथी आखाडय़ांसमवेत चर्चा करून कुंभशी संबंधित माहिती संकलित केली जात आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या शाही पर्वणीत काही चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाचे मूळ कथानक, उपकथानक वेगळे असल्याचे साळगांवकर यांनी नमूद केले. आपल्याकडे कुंभमेळा म्हणजे शाहीस्नान, पर्वणी, रामकुंड-कुशावर्तावर होणारी गर्दी, नागा साधू, साधूंचे विविध प्रकार, त्यांच्यातील वाद अशा काही समजुती आहेत. मात्र प्रत्यक्ष कुंभमेळा त्यापलीकडे आहे. या वातावरणातून निघणाऱ्या लहरी मनुष्याला सत्कार्यासाठी प्रेरित करतात. मेळ्याच्या अदृश्य पैलूकडे चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात एक व्यक्ती कुंभमेळ्यात घातपात घडविण्यासाठी येते. मात्र येथे आल्यावर अशा काही घटना, प्रसंगाना सामोरी जाते, की त्याला धर्म, शास्त्र, अध्यात्म याची नव्याने ओळख होते. धर्म नक्की काय संदेश देतो याचे आत्मपरीक्षण करताना त्याची पुढील कृती काय राहील, यावर चित्रपट आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.चित्रपटाबाबत महंत, पदाधिकारी यांसह भाविकांसोबत चर्चा केली जात असून, त्यातून वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. या सर्वाचा सारांश चित्रपटात पाहता येईल. त्र्यंबक देवस्थान, कुशावर्त परिसर, शाही मिरवणूक मार्ग आदी ठिकाणी सध्या चित्रीकरण सुरू आहे. पुढील टप्प्यात अन्य काही धार्मिक स्थळांमध्ये चित्रीकरण होणार असून पर्वणीनंतर सहा महिन्यांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात रंगभूमीवरील कलाकार अनिल नाईक, शशिकांत गंधे, प्रभाकर मोरे, सुनील जाधव यासह अन्य कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू असून लवकरच या विषयी अंतिम निर्णय होईल, असे साळगांवकर यांनी सांगितले.