आंबा महोत्सवात जिल्हा बँक अध्यक्षांचा सल्ला
शहर परिसरात दर वर्षी कोकणातील आंबा उत्पादक महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम विपणन करतात. त्यांच्याकडून स्थानिक शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या पिकांचे ‘विपणन’ स्वत: करायला हवे. कांदाभावाची अस्थिरता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण पाहता असे विपणन गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले. येथील एनडीसीसी बँकेच्या सभागृहात कोकण पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
आंब्याच्या पेटीची फीत कापून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास उद्योगपती संतोष मंडलेचा, महोत्सव संयोजक दत्ता भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दराडे यांनी शेतकऱ्यांवर ओढवलेल्या स्थितीवर बोट ठेवले. खराब हवामान आणि शेत मालास मिळणारा भाव, बाजार पेठेतील अस्थिरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना कोकण पट्टय़ातील शेतकऱ्यांनी तसा मार्ग अनुसरला नाही. उलट अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांना तोंड देत त्यांनी स्व बळावर तोडगा शोधला. आज तेथील आंबा उत्पादक नाशिकमध्ये येऊन ११ वर्षांपासून आंबा महोत्सव आयोजित करत आहेत. आपल्या मालाचे विपणन करून बाजारपेठ मिळवत आहेत. पण आपल्याकडील द्राक्ष किंवा अन्य शेती उत्पादनाचे असे इतरत्र विपणन का झाले नाही, याचा विचार शेतकऱ्यांनी करणे गरजेचे असल्याचे दराडे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी बदलत्या बाजारपेठेचा वेध घेत स्वत:च्या कार्यशैलीत बदल करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
महोत्सवात कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेश्वर येथील ३५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. अस्सल नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले हापूस आंबे ही महोत्सवाची खासियत असून ५०० रुपये डझन या प्रमाणे आकारमानानुसार त्याचे दर वेगवेगळे आहेत. ग्राहकांना अर्धा डझन प्रमाणे आंबे हवे असतील तशी सुविधाही या ठिकाणी आहे. या शिवाय काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा यापासून बनविलेला विविध प्रकारचा कोकण मेळा महोत्सवात असल्याचे संयोजक भालेराव यांनी सांगितले. तसेच कोकण परिसरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती देणारा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आला असून उन्हाळी सुट्टीत कोकणात यावा, असे आवाहन करणारा कोकणी भाषेतील खास फलकही उभारण्यात आला आहे. नाशिककरांनी आतापर्यंत महोत्सवास उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला आहे. यंदाही तसाच प्रतिसाद राहील, अशी आशा विक्रेत्यांनी
व्यक्त केली.

यंदा आंबा कमी
दर वर्षीच्या तुलनेत यंदा अवकाळी पाऊस, खराब हवामान यामुळे आंब्याचे उत्पादन काही अंशी कमी आहे. त्यातही हवामानातील बदलांमुळे आंब्यावर काळसर डाग असले तरी आंब्याचा दर्जा सर्वोत्तम आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कीड वा नुकसानदायी असे काही नाही. दराबाबत ग्राहकांकडून साशंकता व्यक्त होत असली तरी किलो व डझनाचा विचार केला तर दर सारखेच आहेत. शिवाय ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा दिला जाणार आहे.
– संजय खानविलकर (आंबा उत्पादक, लांजा)