वन कर्मचारी पकडण्यासाठी आल्यावर कधी त्यांच्या वाहनावर हल्ला, तर कधी डरकाळी फोडून एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊन गुंगारा देणाऱ्या बिबटय़ाला पकडण्यात अखेर वन कर्मचाऱ्यांना यश आले. तालुक्यातील पोखरी शिवारातील मन्याड नदीच्या पात्रालगत वाल्मीक बोढरे यांच्या कांद्याच्या शेतापासून सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला वन कर्मचाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ अखेर सायंकाळी साडेसहा वाजता बिबटय़ाला जेरबंद करण्यात आल्यावर संपला.

[jwplayer gLyhqAeU]

सकाळी आठच्या सुमाराला कांद्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी बाबासाहेब बोढरे हा मुलगा गेला असता त्याला शेतात बिबटय़ा दिसला. त्याने घराकडे येऊन सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व धनराज बुरकुल यांना माहिती दिली. त्यांनी लागलीच खात्री करून वन विभागाला कळविले. वन विभागाचे कर्मचारी शेतात दाखल झाले.

सकाळी नऊ वाजता ज्या कांद्याच्या शेतात बिबटय़ा गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले होते त्या शेतात वन कर्मचारी डी. वाय. खेमणार व भालेराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शोध मोहीम सुरू केली. परंतु, बिबटय़ाचा मागमूसही दिसत नसल्याने फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आवाजानेही बिबटय़ा शेतातून बाहेर आला नाही. हे पाहून कर्मचाऱ्यांनी बिबटय़ा शेतात नसावा असा अंदाज बांधत शेतात शिरण्याची हिंमत केली. भालेराव या वन कर्मचाऱ्याला बिबटय़ा शेतातच असल्याचे दिसल्यावर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांनी सावध केले. त्यानंतर नाशिक येथील वन विभागाच्या वरिष्ठांना त्यासंदर्भात कळविण्यात आले. वन अधिकारी व्ही. जी. अहिरे यांनी नाशिक येथील कृती पथक व पिंजऱ्याची व्यवस्था केली.

वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. जे. अहिरे, नाशिक येथील वनरक्षक शरद थोरात, पी. एम. पवार, बी. एस. आहेर, बी. जे. सूर्यवंशी. भालेराव, खेमणार, एस. पी. सातपुते, सुनील खंदारे, गोपाल राठोड आदींचा या पथकात समावेश होता. जेरबंद करण्यात आलेल्या बिबटय़ाला नाशिक येथे नेण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यावर बिबटय़ाला वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल, अशी माहिती वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी अहिरे यांनी दिली.

१० तासाच्या शोध मोहिमेनंतर बिबटय़ा जेरबंद

सकाळी ९ वाजल्यापासून  कांद्याच्या शेतात वन कर्मचाऱ्यांकडून बिबटय़ाला शोधण्यास सुरूवात झाली. सायंकाळी चार वाजता नाशिकहून  पथक दाखल झाले. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. जे. अहिरे  आणि त्यांच्या पथकाने कांद्याच्या शेतात वाहनाद्वारे शिरून पहाणी करण्यास सुरुवात केली. शेतात दबा धरून बसलेला बिबटय़ा आढळल्यानंतर त्यांनी त्यास ‘ब्लो पाईप’ या उपकरणाद्वारे इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्याची तयारी केली असता बिबटय़ाने त्यांच्या वाहनावर झडप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यातून कर्मचारी स्वत:ला सावरत असतानाच बिबटय़ा गायब झाला. पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. वन कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शेताला गराडा घालून पुन्हा फटाक्यांचे आवाज केले. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. तो जवळच्याच शेतात शांत पहुडला होता. एका कर्मचाऱ्याला तो दिसला.  बिबटय़ाला पकडण्याचे विशेष प्रशिक्षण प्राप्त असलेले वन संरक्षक अशोक काळे आणि शरद थोरात यांनी योग्य वेळेची वाट बघत  वन्य प्राण्याला गुंगी येण्यासाठी तयार करण्यात आलेले इंजेक्शन ‘ब्लो पाईप’ व्दारे बिबटय़ावर डागले. इंजेक्शन बिबटय़ाच्या मागील बाजूस लागले. चवतळलेल्या बिबटय़ाने थोरात यांच्यावर झेप घेऊन पुन्हा पळ काढला आणि शेजारच्या शेतात आश्रय घेतला. वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी त्याचा पाठलाग करीत शेतापर्यंत पोहोचले. बिबटय़ाला इंजेक्शन लागल्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. बिबटय़ाची हालचाल मंदावू लागली. ही संधी साधत त्यास इतर साहित्याच्या सहाय्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पकडण्यात आले. सुमारे नऊ ते दहा तास हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता.

[jwplayer pqdTtL1f]