नाशिकमधील हिरावाडी आणि मेरी हायड्रो परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात सोमवारी वन विभागाला यश आले. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा लावला होता.  गेल्या आठवड्याभरापासून नाशिकमधील डावा कालवा परिसरात या बिबट्याने दहशत निर्माण केली होती. नागरी वस्तीमधील अनेकांना या बिबट्याने दर्शन दिले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पहाटे आणि रात्रीच्यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारवर्गाला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत होते. हा बिबट्या केव्हाही नागरी वसाहतीत प्रवेश करू शकतो, या भीतीने नागरिक दहशतीत होते. गंगापूर धरण क्षेत्रातील जंगलापासून ते शहरातील हिरावाडी परिसरापर्यंत या बिबट्याचा मुक्त वावर होता. वनविभागाने या कॉरिडॉरमध्ये ४ पिंजरे लावले होते. आज हा बिबट्या पकडला गेल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांचाही जीव भांड्यात पडला आहे.