देशी दारू दुकान हटविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी संबंधित दुकानाची तोडफोड करीत ते पेटवून दिल्याची घटना शनिवारी सटाणा शहरालगतच्या मळगाव येथे घडली. महिलांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी, दुकानचालक यांच्यावर हल्ला चढविला. त्यात चार जण जखमी झाले.

सटाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अडीच हजार लोकवस्तीचे मळगाव आहे. आरम नदी किनाऱ्यालगत देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे तळीरामांचा उपद्रव वाढून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेत दारू दुकान हटविण्याचा ठरावही केला होता. या संदर्भात पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने महिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि दीडशे ते दोनशे महिला लाठय़ा-काठय़ा घेऊन थेट दुकानावर चालून गेल्या. दुकानाची तोडफोड करण्यात आली. या वेळी तळीरामाने महिलांना शिवीगाळ केली. यामुळे जमाव अधिकच भडकला. दुकानाला आग लावण्यात आली. मोठय़ा प्रमाणात दारूसाठा असल्याने क्षणार्धात दुकान भस्मसात झाले. त्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक बशीर शेख, हवालदार रवींद्र काटकर यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु जमावाने त्यांना जुमानले नाही. उलट त्यांना धक्काबुक्की केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलिसांची सुटका केली. नंतर जमावाने दुकानमालक भाऊसाहेब केदा सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. पोलीस कुमक दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविले. संतप्त महिलांनी आपला मोर्चा सटाणा पोलीस ठाण्याकडे वळविला. काही महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत ताहाराबाद नाक्यावर ठिय्या देत विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक रोखून धरली. मालेगावहून दंगा नियंत्रण पथके दाखल झाल्यानंतर आंदोलनकर्त्यां महिलांची धावपळ झाली. दुकान हटविण्याच्या मागणीसाठी महिलांनी तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याकडे निवेदन सादर केले. दरम्यान, दारू दुकानाचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलांच्या मागणीनुसार वेळीच कारवाई झाली असती तर इतका मोठा अनर्थ घडला नसता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.