‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत १६ महाविद्यालयीन संघांनी विविध विषयांना स्पर्श केला.
या एकांकिकांच्या विषयांचा थोडक्यात घेतलेला हा वेध.
एका गाढवाची गोष्ट
सध्याच्या काळात मानवी संवेदना किती बोथट झाल्या याचा प्रत्यय देणारी एकांकिका म्हणजे ‘एका गाढवाची गोष्ट’. रस्त्यावर एका गाढविणीची प्रसुती होते. या प्रसुतीत गाढवाचे पिल्लू मरते. मात्र त्या बेवारस पिलास आणि जखमी अवस्थेत असलेल्या गाढविणीला योग्य औषधोपचार मिळण्यासाठी धडपडणाऱ्या दोघी जणी.
त्यांना सरकारी अनास्थेची येणारी प्रचिती, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)

जाने भी दो यारों
आसपास घडणाऱ्या घडामोडींमुळे आजच्या तरुणाईची अस्वस्थता हेरताना कोणतीही गोष्ट तडीस नेण्यासाठी शॉर्ट कट शोधण्याच्या प्रवृत्तीवर या एकांकिकेतून प्रकाशझोत. महाविद्यालयीन तरुण प्रेमात पडण्यासाठी जसा आतूर असतो. तसेच देशाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत संतप्त देखील. घरातून अभ्यासाचा घोषा सुरू असला तरी त्याचे मन त्यातही रमतेच असे नाही. ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, त्या करण्यातही त्याला कंटाळा. मग घरादारातून चाललेल्या ‘काही तरी कर’च्या पाठपुराव्यावर पुन्हा तो झटपट प्रसिध्दीचा मार्ग शोधतो. भ्रष्टाचाराविषयी असणाऱ्या संतापाला राजकीय नेत्याच्या खुनातून वाट मोकळी करून देतो.
(क. का.  वाघ महाविद्यालयाचे परफॉर्मिग आर्ट्स, नाटय़ विभाग)

सेझवरील अंधार
सिन्नर तालुक्यात विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझसाठी जागा दिल्यामुळे शेतकरी वर्गावर ओढवलेली बिकट स्थिती या एकांकिकेत वेगळ्या धाटणीने मांडण्यात आली आहे.
नगरीचा राजा व प्रधान शेतजमीन बळकविण्यासाठी शेतकऱ्यांसह राणीलाही भूलथापा देतात. जमीन गेल्यानंतर हे षडयंत्र उघड होते.
राजा व प्रधानच्या विविध उद्योगांची शिक्षा देण्यासाठी अखेर राणीला राज्यशकट हाती घ्यावा लागतो. या एकांकिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले
(गु. मा. दा. कला आणि भ. वा. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर)

भारत माझा देश आहे
उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शेत जमिनींवर डोळा ठेवणारी शहरी मंडळींची कार्यशैली नवीन संकटे कोसळण्यास कारणीभूत ठरत आहे. डोंगर-दऱ्या ही खरेतर निसर्गदत्त देणगी. मात्र, वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांचे सपाटीकरण सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. डोंगर-दऱ्या फोडण्याचे उद्योग स्थानिकांच्या जिवावर बेतणारे ठरतात. ही बाब लक्षात आल्यावर जमीन विक्रीला विरोध करत शेतकरी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सजग झाला आहे.
(एमईटीचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय)

तो मारी, पिचकारी, सनम मेरी प्यारी
आजच्या तरूणाईला ऐशआरामात जगण्याची, चंगळवाद उपभोगण्याची वृत्ती वाढीस लागली आहे.
आपला सोबतीचा मित्र किंवा सहकारी दारू, तंबाखू, सिगारेट घेत असेल तर आपण का नाही, असा प्रतिष्ठेचा विषय करीत व्यसनाधिनतेकडे ओढला जात आहे.
व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम, इतरांचा व्यसनी लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आरोग्यावर होणारा त्याचा विपरीत परिणाम याकडे लक्ष वेधत असतांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला आहे.
(ना. शि. प्र. मंडळाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी)

जीवाची मुंबई<br />मुंबईची जीवन वाहिनी म्हणजे लोकल. असंख्य वेदना, आनंद, व्यथा सर्व काही सामावून घेतांना कोटय़वधी प्रवाशांना जगण्याचे बळ देणारी. मात्र या बलस्थानावर दहशतवादाच्या माध्यमातून घाला घातला जातो. त्यात निरपराधांना नाहक जीव गमवावा लागतो. या घटनेवर भाष्य करतांना त्यांच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
(के. पी. जी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी)

टिळक इन ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी
स्वातंत्र्योत्तर काळात देशाने झपाटय़ाने विकास साधणे आवश्यक असले तरी सध्या भलत्याच गोष्टींचा सुकाळ झाला आहे. कोणाला ऐषोरामी जीवन जगायचे तर कोणाला जमेल त्या मार्गाने पैसा जमवायचा आहे. देशाच्या विकासासाठी लोकमान्य टिळकांनी अशा सर्व घटकांना देशाच्या प्रगतीसाठी केलेले मार्गदर्शन ही या एकांकिकेची संकल्पना आहे.
(शताब्दी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सिन्नर)

द परफेक्ट ब्लेंड
सध्याच्या धावत्या जगात नात्यांची गुंतवणूक किती क्लिष्ट वळण घेत आहे, त्याचा प्रामुख्याने स्त्रीवर होणारा परिणाम यावर बोट ठेवणारी ही एकांकिका. या अवघड परिस्थितीतून करिअर की कुटूंब व्यवस्था या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या स्त्रीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील द्वंदाचा यामध्ये विचार करतांना दोन व्यक्तीरेखांवर भर देण्यात आला आहे. करिअरच्या मागे धावणारी ‘ती’ आणि चार चौघीसारखे आयुष्य जगायचे असे स्वप्न बघणारी ‘ती’ एका वळणावर एकत्र येतात आणि सुरू होते. अप्रत्यक्ष पडताळणी आपण केली ती योग्य की अयोग्य याची. नात्याच्या भावनिक गुंतवणुकीकडे लक्ष वेधतांना मानवी स्वभावाचे विविध पैलु उलगडले आहेत
(न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)

दोघी
आयुष्याच्या एका वळणावर अवचित ओंजळीत येऊन पडणाऱ्या ‘प्रेम’ या मृगजळामागे धावतांना ठेच लागलेल्या दोन तरूणींची व्यथा  ‘दोघी’ मध्ये मांडण्यात आली. आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याच मुलीचा वापर करणारे वडील. वडिलापासून दूर पळण्याचा प्रयत्न करणारी ती..सामाजिक माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली ती..‘ती’च्या तारूण्याचा होणारा गैरवापर..या चक्रव्यूहात अडकून पडलेल्या तीची होणारी घुसमट, भावनिक कुंचबना याकडे लक्ष वेधतांना वेगवेगळ्या नात्याकडून तिचे होणारे शोषण यावर भाष्य
(भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालय)

व्हॉट्स अॅप
आजच्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेले सोशल मीडिया माध्यम. तरूणाईचा उत्साह. त्यांच्या भावना. भावनांचा कल्लोळ याचे प्रतिबिंब ‘व्हॉट्स अॅप’ च्या माध्यमातून उमटते. व्हॉट्स अॅपवर दिल, दोस्ती, दुनियादारी निभावणारा ग्रुप, बदलत्या घटनांचे त्यावर उमटणारे पडसाद, दोन धर्मातील तेढ असो वा व्यक्तीभेद, माध्यमांचा विधायक वापर कसा होऊ शकतो यावर टिप्पणी
(के.टी.एच.एम. महाविद्यालय)

वादळवेल
२१ व्या शतकात ‘स्त्री पुरूष समानता’ चा डंका पिटला तरी अद्यापही ग्रामीण भागात वंशाला दिवा हवा, ही भ्रामक अंधश्रध्दा आहे. यावर भाष्य करतांना घरातील मोठी मुलगी म्हणून कौटुंबिक जबाबदारी पार पाडतांना होणारी भावनिक घालमेल, तारूण्याच्या उंबऱ्यावर असतांना भावनांना फुटणारे धुमारे, संसार की जबाबदाऱ्या या चक्रात सापडलेल्या मोठय़ा मुलीच्या भावविश्वाचे प्रतिबिंब मांडण्यात आले
(शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालय, सिन्नर)

जंगल
जंगलात भटकंती करण्यासाठी निघालेला सहा जणांचा एक ग्रुप. जंगलात फिरतांना चुकलेला रस्ता. त्यातून प्रत्येकाची होणारी चिडचिड. अस्वस्थ करणारा प्रवास, हे मांडण्यात आले आहे. व्यक्तीरेखांवर भर देत असताना त्याला बेरोजगारी, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यासह विविध प्रश्नांची जोड देण्यात आली आहे.
(लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय)

कोलाज्
एखादे चित्र पहावयास खूप सुंदर वाटते. त्यात विविध रंगांचा एकत्रित कोलाज् पाहतांना प्रत्येक रंग, त्याची छटा, शेजारच्या रंगाशी त्याने साधलेली रंगसंगती दिसते. वास्तव जीवनात एखादी घटना आपल्या प्रत्यक्षदर्शी दिसत असतांना त्याला विविध घटनांची किनार असते. कोलाजच्या माध्यमातून महिलांवर होणारे विविध अत्याचार, त्यात होरपळणारी स्त्री, तिची होणारी घुसमट, तिचा प्रत्येक पातळीवर जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष, याचे प्रतिबिंब ‘कोलाज’ या संगीत नाटिकेत दिसते.
(बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय )
जेनेक्स
नव्या-जुन्या पिढीच्या संघर्षांच्या या आभासावर अचूक भाष्य करतांना ‘जेनेक्स’च्या माध्यमातून त्यावर पर्याय दिला गेला आहे. एकीकडे तरूणाई बिघडली आहे, तिला चंगळवाद महत्वाचा वाटतो, नात्याची बांधिलकी यांना नको, अशा आरोपांना उत्तर देतांना आजची पिढी नात्याला लेबलिंग का लावावं, आम्ही काम करतो थोडी विश्रांती म्हणून तो क्षण अनुभवासा वाटणे म्हणजे चंगळवाद का, अशा प्रश्नांची सरबत्ती करते.
(हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालय)
त्रिकाल
मनुष्याच्या एका निर्णयाने भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान यावर होणारा परिणाम, त्यानुसार बदलणारी परिस्थिती ही संकल्पना मांडण्यात आली. कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने समोरच्याला केलेली नऊ लाखांची मदत ही अफराताफर होऊ शकते अशी परिस्थिती असतांना त्याचे काय पडसाद उमटू शकतात यावर यात भाष्य करण्यात आले आहे.
(क. का. वाघ महाविद्यालय, परफॉर्मिग आर्ट, संगीत विभाग)

एक अभियान
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकताना शासकीय व सामाजिक पातळीवर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधोरेखीत करण्यात आला आहे. हगणदारीमुक्त अभियान राबवून कित्येकांची मानसिकता बदललेली नाही. नदी प्रदूषणाला सर्व घटक हातभार लावतात. हगणदारीमुक्त गावाचा पुरस्कार कसा मिळविला जातो, हे मांडण्यात आले. शौचालयाचा वापर भलत्याच कारणांसाठी केला जातो. पुरस्कारापोटी मिळालेल्या रकमेची सरपंच परस्पर विल्हेवाट लावतात.
(म. स. गा. महाविद्यालय, मालेगाव)