महाविद्यालयीन विश्व म्हणजे स्वप्नाळू जग. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची जिद्द असणारी काही मंडळी याच वातावरणात संधीच्या शोधात फिरतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’सारखी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा अशा मंडळींना हक्काचे व्यासपीठ देतेच, पण पुढे जाण्याची दिशा अधोरेखित करते. माध्यमे समाजमनाचा आरसा असली तरी युवा मनांची स्पंदने स्पर्धेद्वारे टिपण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय असून तरुण कलावंतांच्या आंतरिक ऊर्मीला या निमित्ताने प्रोत्साहन मिळाल्याची भावना प्राचार्याकडून व्यक्त होत आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत धडक देणाऱ्या पाच महाविद्यालयांनी अंतिम फेरीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या तयारीने वेग घेतला आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांचे प्रयत्न पाहता प्राचार्यानी या स्पर्धेचे स्वागत केले आहे.

जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी नाटय़शास्त्र विभाग सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असल्याचे सांगितले. स्पर्धा होतात. पारितोषिक जिंकतात. मान सन्मान महाविद्यालयाला मिळतो. त्याचे नावीन्य नाही. पण या माध्यमातून सच्च्या कलावंताला व्यासपीठ मिळते आणि आपणही कलासक्त कलावंतापर्यंत पोहचतो हे महत्त्वाचे ठरते. सध्या महाविद्यालयात ‘लोकसत्ता लोकांकिका’ची तयारी आहे. कमी वेळात मुलांनी लेखनापासून दिग्दर्शनपर्यंत सर्व तांत्रिक बाजू सांभाळत यश संपादन केले. या स्पर्धा पारदर्शक असून विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमुळे काम करण्यास उभारी मिळते, हे त्यांनी सांगितले.

क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्सचे प्राचार्य मकरंद हिंगणे यांनी या स्पर्धेत महाविद्यालयाचा सहभाग पहिल्या वर्षांपासून असल्याचे सांगितले. मागील वर्षी अंतिम फेरीत ‘लक्ष्यवेधी एकांकिका’ हा सन्मानही मिळाला. या वर्षी विद्यार्थ्यांनी ‘लोकांकिका’त स्वत:ची वेगळी छाप पाडायची असा निर्धार केला असून त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे कसदार कलावंतांना थेट चित्रपट, मालिकांमध्ये झळकण्याची संधी मिळते. त्यांच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे.

एनबीटी विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या अस्मिता वैद्य यांनी ‘लोकांकिका’च्या विभागीय फेरीत महाविद्यालयाचा संघ आला हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मुलांनी केलेले प्रयत्न, त्यासाठी त्यांची चाललेली धडपड मार्गी लागली. लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत र्सवच बाबी हाताळण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या निमित्ताने महाविद्यालयात नाटय़ चळवळ उभी राहते याचा आनंद वाटतो असे वैद्य यांनी सांगितले. हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत असून त्यांच्यातील अंतरिक ऊर्मीला योग्य दिशा मिळत आहे.

माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी त्यांना पुढील काळासाठी महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.