महाविद्यालयीन विश्व म्हणजे धम्माल मस्ती.. कट्टा गँग.. नियमित तासिकांना आपल्या मर्जीप्रमाणे बुट्टी.. हे सर्व (गैर) समज मोडीत काढत मिळालेल्या संधीचे सोने करत योग्य नियोजनाद्वारे आपली कला जोपासणाऱ्यांची संख्या कमी नाही. सार्वजनिक गणेशोत्सव, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज विविध एकांकिकांपर्यंत पोहचला आहे. आजवरच्या प्रवासाने वेगळी ओळख दिली यापेक्षा जगणे शिकवले असे नवोदित कलावंत सांगतात. यामुळे ‘एकांकिका आणि ते’ असे समीकरण रुजत असताना पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन द्यावे, हौशी ते व्यावसायिक ही दरी भरून काढण्यास मदत करावी असे आवाहन चित्रपट नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांनी केले आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटीव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची नाशिक विभागीय अंतिम फेरी मंगळवारी येथे होत आहे. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेसाठी आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. स्पर्धेमुळे एकांकिकेतील काही नवे चेहरे आज वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमध्ये चमकत आहेत. तर काहींनी लेखक, दिग्दर्शक यासह अन्य तांत्रिक गोष्टींत आघाडी घेतली आहे. क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्सचा चेतन वडनेरे सध्या कलर्स वाहिनीवरील ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतो. लोकांकिकेच्या पहिल्या पर्वात त्याने ‘हे राम’ या एकांकिकेत काम केले होते. एकांकिका हे असे माध्यम आहे की जेथे रंगमंचावर कसे वावरायचे याचे बाळकडू मिळते असे त्याचे म्हणणे. या ठिकाणी चुकलो तरी फार काही बिघडत नाही.

कारण त्या चुका दाखवणारे परीक्षक, प्रेक्षक आपल्याला समजावून सांगतात. नाटकाशी संबंधित मूळ संकल्पना येथे अधिकच स्पष्ट होत असतांना कलाकार म्हणून वेगवेगळ्या तंत्राचाही परिचय होतो. येथे तुम्ही कलाकार म्हणून जसे रंगमंचावर वावरता, तसे गरज पडल्यास तुम्हाला वेशभूषा, संगीत, नेपथ्य यातील कुठलीही खिंड लढवावी लागते. हा अनुभव पुढील वाटचालीस दिशा देणारा ठरतो, असे चेतन सांगतो.

केटीएचएम महाविद्यालयाचा आदिल शेख वेगळ्याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधतो. आपण आवड म्हणून वेगवेगळ्या एकांकिकांमध्ये सहभागी झालो. आपल्याला सर्व यायलाच हवे या अट्टहासाने लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्व क्षेत्रात स्वैर मुशाफिरी करताना ती ती भूमिका अनुभवली.

रंगमंचावर नाटक सुरू असतांना प्रेक्षागृहातून येणारी प्रत्येक टाळी त्यावेळी डोळ्यासमोर त्या एकांकिकेचा प्रवास उभा करते. पारितोषिकाच्या रूपाने त्याच्यावर परीक्षक, प्रेक्षकांची मोहर उमटताना पुढील एकांकिका, नाटय़ स्पर्धेसाठी प्रेरणा मिळते. या निमित्ताने साचेबद्ध अडकलेल्या आयुष्याचा नव्याने प्रवास सुरू होतो आणि त्यातून नवीन ओळखी, नवे काही शिकायला मिळते. म्हणून एकांकिका आपणास भावत असल्याचे तो सांगतो.

एनबीटी विधि महाविद्यालयाच्या प्रफुल्ल लेलेने लोकसत्ता लोकांकिका, राज्य नाटय़ स्पर्धा, पु. ल. देशपांडे एकांकिका स्पर्धा अशा विविध स्पर्धेत सातत्याने सहभाग असल्याचे नमूद केले. या माध्यमातून माणूस म्हणून व्यक्त होणे सोपे आहे. हसण्यातून त्या विषयाला एखादी झालर देण्यापेक्षा नाटकातून तो विषय अधिक उठावदारपणे मांडता येतो. त्यातून तो विचार एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहचतो, रुजतो हे सर्वात महत्त्वाचे. यासाठी वेगवेगळ्या नाटकात सहभागी व्हायला आवडते, असेही त्याने सांगितले.

हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयाच्या भक्ती आठवलेने महाविद्यालयाचे सीमित जग ओलांडायची संधी स्पर्धा देत असल्याचे सांगितले. यातून नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या प्रत्येकाच्या तऱ्हा जवळून अनुभवता येतात. दिग्दर्शक म्हणून काम करताना चिकाटी ठेवावी लागते. एक एक प्रसंग समोरच्या कलाकारांकडून करून घेताना वेगळा विचार करायची सवय लागते. अभ्यास आणि घर हे करताना छंद जोपासण्यासाठी हक्काचे ‘कॉर्नर’ म्हणून अशा स्पर्धा ठरतात. त्यात गंमत अशी की प्रत्येक स्पर्धा वेगळी असते, तिचा अंदाज येत नाही. संघर्ष करून चुका समजून घेत काम पुढे नेणे शक्य होते.

पालकांनी मुलांना संधी द्यावी

नवोदित कलावंताचा उत्साह शिगेला पोहचलेला असताना मोजकेच पालक या कलावंताचे, कलेचे समर्थन करतात. मुलांना चंदेरी, सोनेरी पडद्याची दारे खुली होत असताना पालक त्यांना अभ्यास किंवा करिअरच्या शर्यतीत पुढे ढकलतात. स्पर्धेपुरते ठीक आहे. प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करण्याची काय गरज, या क्षेत्रातील अस्थिरता मुलांना तारू शकेल का, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित होतो. हे क्षेत्र सुरेख असून आत्मविश्वास आणि समोरच्यावर विश्वास ठेवत मुलांना एक संधी देण्याची गरज आहे.

– विद्याधर पाठारे (आयरिस)