प्रसार माध्यमांच्या कार्यशैलीची दुसरी बाजू दर्शविणाऱ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत अखेर बाजी मारली. महाकवी कालिदास कला मंदिरात रंगलेल्या स्पर्धेत या एकांकिकेने उत्कृष्ट एकांकिकेसह तीन वैयक्तिक पारितोषिकांवर वर्चस्व सिद्ध केले. हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयाची ‘ब्रेकिंग न्यूज’ आता मुंबईतील महाअंतिम फेरीत इतर विभागांमधून निवडलेल्या सवरेत्कृष्ट एकांकिकांशी लढत देणार आहे.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटीव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा राज्यस्तरावर होत आहे. ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेसाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी आहेत. मंगळवारी सायंकाळी नाशिक विभागीय अंतिम फेरी रंगली. केटीएचएम महाविद्यालयाची ‘वेटिंग फॉर सेन्सेशन’, क. का. वाघ महाविद्यालयाची  ‘१२ किमी’, न. ब. ठाकूर विधि महाविद्यालयाची ‘मनोहर साठेंचं काय झालं?’ जळगांव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाची ‘अरण्य’ आणि हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयाची ‘ब्रेकिंग न्यूज’ या पाच एकांकिकांमध्ये लढत झाली. त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’अव्वल ठरली. या फेरीसाठी परीक्षक म्हणून अशोक समेळ आणि अभिराम भडकमकर यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण परीक्षक आणि दै. ‘लोकसत्ता’ मुंबईचे महाव्यवस्थापक संजय तेलंगे यांच्या हस्ते करण्यात आले. एकांकिका पाहण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक, पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते. आपाल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. पारितोषिक वितरण सोहळ्यात तरुणाईचा जल्लोश उफाळून आला. परीक्षकांनी तरुण पिढीला समकालीन वास्तवाचे भान असून अनेक विषय त्यांनी संहितेत मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. विषयात वेगळेपण असून काही चुका टाळयला हव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ब्रेकिंग न्यूज (हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – १२ किमी (क. का. वाघ महाविद्यालय, नाशिक)
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – वेटिंग फॉर सेन्सेशन (केटीएचएम महाविद्यालय, नाशिक)

पुणे विभागीय अंतिम फेरी हाऊसफुल्ल’!

पुणे : ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये प्राथमिक फेरीतून पुणे विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या सवरेत्कृष्ट एकांकिकांमधील चुरस अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी बुधवारी भरतनाटय़ मंदिर हाऊसफुल्ल झाले होते. प्रेक्षकांनी दिलेली पसंती आणि तरुणाईचा मुक्त जल्लोष स्पर्धेची रंगत वाढविणारा ठरला.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पुणे विभागाच्या अंतिम फेरीत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय आणि स.प.महाविद्यालय दाखल झाले होते. एकापेक्षा एक सरस विषय व तरुणाईचा आविष्कार अनुभवण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने पुणेकरांना मिळाली. त्याचा पुरेपूर लाभ घेत प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरश: डोक्यावर घेतली.प्रेक्षकांसाठी लोकसत्ता कार्यालय व भरतनाटय़ मंदिर येथे प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका मिळविण्यासाठी सकाळपासूनच प्रेक्षकांची रिघ लागल्याचे चित्र होते. सायंकाळी ४.३० वाजता या फेरीची सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीपासूनच भरतनाटय़ मंदिराच्या परिसरात प्रेक्षकांची गर्दी झाली होती. आपापल्या एकांकिकांना पाठिंबा व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाईही मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होती. त्यामुळे अक्षरश: बाल्कनीही प्रेक्षकांनी भरून गेली होती. एकांकिका सुरू होण्यापूर्वी आपापल्या महाविद्यालयांच्या नावाच्या घोषणांनी स्पर्धेतील चुरस वाढविली. प्रत्येक एकांकिका संपल्यानंतर ‘करंडक कुणाचा..’ असा जल्लोषपूर्ण आवाज संपूर्ण नाटय़ागृहातून घुमत होता. प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक एकांकिकेला व त्यातील कलाकारांना दाद दिली जात होती.

प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी गिरी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी या फेरीच्या परीक्षणाची धुरा सांभाळली. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा होत असून आयरिस प्रॉडक्शन्स टॅलेंट पार्टनर आहेत. ‘झी युवा’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’, ‘केसरी’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत.