महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते झाले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. शानदार संचलनाचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोंदे यांनी केले.
आरोग्य विभागाने ‘बेटी बचाव’चा संदेश देण्यासाठी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथाने सर्वाचे लक्ष वेधले. त्यासोबत जलयुक्त शिवार, समाज कल्याण विभाग, स्वच्छ भारत अभियान, १०८ रुग्णवाहिका आदी चित्ररथ सहभागी झाले.
या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण डवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक भगत, संजय शुक्ला, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण अहिरे, पोलीस हवालदार उत्तम सोनवणे, काळू बेंडकोळी, सुभाष जाधव, सचिन काळे, पोलीस नाईक भाऊसाहेब भगत, दत्तू खुळे यांना गुणवत्तापूर्ण सेवा व शौर्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक पंडित पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव सूर्यवंशी यांचा राष्ट्रपतींचे पदक प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. राधिका गायकवाड, मनोहर जगताप व नीलेश ठाकरे यांना युवा पुरस्काराने, तर चांदोरी गावचे तलाठी सी. ए. पंडित यांना उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे डवले यांनी सांगितले. शेती कर्जाचे पुनर्गठन करून खरीप हंगामासाठी कर्ज मिळण्याची सुविधा, अधिक फायद्याची संयुक्त पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्य़ाच्या क्रीडा क्षेत्राच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी धावपटू कविता राऊतच्या विशेष कामगिरीचा उल्लेख केला. जलयुक्त शिवार योजनेची जिल्ह्य़ात प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.