जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त नाशिक नगरीत राज्यपाल महोदयांचे आगमन आणि या दौऱ्यात वाहतूक नियमनार्थ पोलीस यंत्रणेने दाखविलेली सजगता सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करणारी ठरली. पोलीस कवायत मैदानापासून ते कॉलेज रोडवरील कार्यक्रमस्थळापर्यंत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. सुरक्षिततेच्यादृष्टिने ही बाब गरजेचीच. परंतु, वाहतूक नियमनाचा इतका गहजब झाला, की सर्वसामान्य वाहनधारकांची त्रेधातिरपिट उडाली. एरवी, कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल कसरतींमुळे अन्य वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरावा लागतो. त्यावेळी अपवादाने दिसणारे पोलीस आज मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्याने ‘राज्यपाल येती घरा..’ अशीच काहिशी भावना स्थानिकांच्या मनात उमटली.

अनेक महाविद्यालयांच्या सानिध्यामुळे कॉलेजरोड हा तरुणाईचा आवडता रस्ता. या परिसरातील महाविद्यालयातीलच नव्हे तर, वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येणाऱ्या तरुणाईची संख्या अतिशय मोठी आहे. काही दुचाकीस्वारांच्या भरधाव होणाऱ्या कसरतींमुळे धोकादायक बनलेला हा मार्ग. काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यास अशाच एका अपघातात प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर या धोकादायक मार्गाविरोधात समस्त प्राध्यापक रस्त्यावर उतरल्याची घटना फार जुनी नाही.

अशा घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, राज्यपाल्यांचे कार्यक्रमास येणे आणि पोलिसांचे सजग होणे स्थानिकांना वेगळीच अनुभूती देणारे ठरले. अधूनमधून मोहीम राबविणारे, लोखंडी जाळ्या लावून विद्यार्थी वाहनांची तपासणी करणारी यंत्रणा या दिवशी अधिकच सजग होती.

राज्यपाल महोदयांचे हेलिकॉप्टर पोलीस कवायत मैदानावर उतरले. तत्पूर्वीच या मैदानापासून राज्यपालांचा ताफा ज्या शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोडने एसएमआरके महाविद्यालयात पोहोचणार होता, तिथपर्यंत ठिकठिकाणी पोलीस यंत्रणेसह वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तैनाती होती. कॉलेजरोडलगतच्या एसएमआरके महाविद्यालयात त्यांचा कार्यक्रम होता. राज्यपाल महोदयांचा ताफा कार्यक्रमस्थळाकडे मार्गस्थ झाल्यानंतर बीवायके चौकात थांबवून ठेवलेली वाहतूक कृषीनगरच्या दिशेने जाऊ दिली गेली नाही. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यास सांगण्यात आले. यावेळी आलिशान मोटारीतून आलेले माजी महापौर मात्र या नियमाला अपवाद ठरले. आपली ओळख दिल्यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले नाही. उर्वरित वाहनधारकांना अशी मुभा मिळाली नाही.

वाहतूक अचानक वळविल्याने गोंधळ

बंदोबस्ताचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला. कॉलेज रोडवरील मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्याची त्यांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे दुचाकीवर येणाऱ्यांना वाहतूक पोलिसांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. राज्यपाल महोदयांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर यंत्रणेने काही विशिष्ट टप्प्यात नियमित वाहतूक अचानक वळविल्याने वाहनधारकांची धांदल उडाली. या काळात कॉलेजरोडवर भ्रमंती करणे अवघड झाल्याची तरुणाईची प्रतिक्रिया होती. पोलीस कवायत मैदानावरील मुख्य प्रवेशद्वार अन्य वाहनधारकांसाठी बंद होते. त्यामुळे पोलीस वसाहतीतून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांना भिंतीवरून उडी मारणे क्रमप्राप्त ठरले. कॉलेजरोडवर मोठा फौजफाटा असल्याने या रस्त्यावर नेहमीच पाहावयास मिळणारे बेदरकार वाहतुकीचे चित्र अकस्मात बदलल्याने स्थानिकांना सुखद धक्का बसला.