शांतता परिषदेत राज्यपालांचे आवाहन

विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विद्यार्थी मोठय़ा संख्येने बाहेर पडत असताना त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी होताना दिसत नाही. शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर दिला जात असून त्याची नैतिक मूल्यांशी सांगड घालण्याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह अध्यापकांपर्यंत पोहचविणारे अभ्यासक्रम तयार करणे आणि तशी अभ्यासपद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्यावतीने येथील एसएमआरके महिला महाविद्यालयात आयोजित १९ व्या जागतिक शांतता परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सोहळ्यास अणुशास्त्रज्ञ डॉ. अनील काकोडकर, यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. बी. पंडित, सचिव डॉ. एम. एस. गोसावी, प्राचार्या दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना ‘डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नागरिकांना शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी सक्षम करणे आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे हे शैक्षणिक संस्थाचे मुख्य उद्दीष्टय़ आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात बदल गरजेचे आहेत. इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या युगात ज्ञान प्रसारासाठी इ-वर्ग महत्वाचे ठरतात.

अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांना शिक्षण उपलब्ध करून द्यावे. शिक्षणाद्वारे उद्योजकतेवर विशेष भर देत विद्यार्थ्यांचा उद्योजक होण्याकडे कल वाढावा यासाठी संस्थेने प्रयत्न करावे, असे आवाहन राव यांनी केले. आगामी काळात भारताला महासत्ता होण्यासाठी वैचारिक नेतृत्व विकसित करावे लागेल.

जगात दहशतवादाचे आव्हान असताना शांततेच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व त्यांनी वेगवेगळ्या दाखल्यातून दिले.

डॉ. काकोडकर यांनी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शिक्षण पध्दतीत बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. निगवेकर यांनी तंत्रज्ञानामुळे देश-विदेशातील सीमारेषा पुसट होत असताना नव्या पिढीला एकतेच्या सूत्राने जोडणे महत्त्वाचे असल्याकडे लक्ष वेधले.

गोसावी यांनी शांतता परिषदेविषयी आपले विचार मांडले. प्राचार्या देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, राज्यपाल तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘रुह’ या स्मरणिकेचे, एस. बी. पंडित लिखित ‘प्राचार्य टी. ए. कुलकर्णी’ पुस्तक, कविता पाटील लिखित ‘महावस्त्र ऑफ महाराष्ट्र-पैठणी’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सहस्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त डॉ. गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्त ‘जागतिक शांतता’ या विषयावर अनोखे भित्तीपत्रक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. युद्ध, युद्धाची मोजावी लागणारी किंमत, भारतावर झालेले अतिक्रमण त्यात वेळोवेळी झालेले करार, शांततेसाठी मिळालेले नोबल पुरस्कार आदींची माहिती देण्यात येत आहे.