महिलांना आपल्या तक्रारी थेट राज्य महिला आयोगाकडे करता याव्यात, यासाठी राज्य महिला आयोगाने पोलीस प्रशासनाच्या ‘प्रतिसाद अॅप’च्या धर्तीवर स्वतंत्र मोबाईल अॅप तयार केले आहे. लवकरच हे अॅप लाँच होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी दिली.

धुळे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने ‘महिला आयोग तुमच्या दारी, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अंतर्गत कार्यशाळा व जनसुनावणी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या धुळ्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महिला आयोगाने तयार केलेल्या अॅपविषयी माहिती दिली. महिला आयोगाकडे सुमारे साडेचार हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी निम्म्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. मात्र तक्रारींचा ओघ वाढतच आहे. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबविणे आवश्यक असून त्यासाठी समाज व्यवस्थेचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. पीडित महिलांसाठी मनोधैर्य योजना सुरू असून त्यांना त्यातून मोठ्या प्रमाणावर निधी वितरीत होतो ही शोकांतिका आहे. याचाच अर्थ

महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारींचा निपटारा जलदगतीने करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आयोगाने ‘महिला आयोग तुमच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. तसेच स्वतंत्र समिती गठीत केली जाईल. यामुळे वेळ व पैसा वाचेल आणि प्रश्न तातडीने सुटतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.