नळावर म्हशींना पाणी पाजल्यामुळे संतापलेल्या एकाने आपल्या चुलतभावावर गोळीबार करण्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या वेळी प्रसंगावधान राखत पत्नीने गोळी चुकविण्यासाठी पतीला ढकलल्याने संबंधित व्यक्ती बचावली. भाऊबंदकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
सुनील नाठे व केशव नाठे हे चुलतभाऊ गावात समोरासमोर वास्तव्यास आहेत. जमिनीच्या कारणावरून उभयतांमध्ये काही वाद असून त्याचे पर्यवसान या गोळीबारात झाल्याचे सांगितले जाते. शेतीबरोबर सुनील हा म्हशींचा व्यवसाय करतो. गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सुनीलने म्हशी पाणी पिण्यासाठी घरासमोरील नळावर सोडल्या. ते पाहिल्यावर संतापलेल्या केशवने सुनीलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यावर केशवने घरात जाऊन पिस्तूल आणले आणि सुनीलच्या दिशेने गोळी झाडली. केशव सुनीलच्या दिशेने गोळीबार करण्याच्या तयारीत असल्याची बाब सुनीलची पत्नी योगिता यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखून सुनीलला ढकलून पिस्तुलातील गोळी चुकवली. या गोंधळामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक मनोहर पाटील व त्यांच्या पथकाने गावात धाव घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या केशव नाठेला ताब्यात घेतले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.