वेगावरील नियंत्रण, हेल्मेट सक्ती याविषयी कितीही प्रबोधन केले तरी वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे शहर परिसरात अपघाताची मालिका अखंडितपणे सुरू आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी मध्यरात्री कुत्रा आडवा आल्याने दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूरच्या तारवाला मळा येथे वास्तव्यास असणारे रामदास कोर (४५) हे दुचाकीवरून सिएट कंपनी ते कार्बन नाका रस्त्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास निघाले होते. याच वेळी जगदीश ट्रान्सपोर्ट कंपनीसमोरून जात असताना अचानक मोकाट कुत्रे आडवे आले. गाडी वेगात असल्याने नियंत्रण मिळविताना कोर यांची तारांबळ उडाली. कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्नात दुचाकी अपघातग्रस्त झाली. त्यात कोर हे गंभीर जखमी झाले. रात्रीची वेळ असल्याने मदत लवकर मिळणेही अवघड झाले.
काही वेळानंतर आसपासच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक ठिकाणी हल्ले चढविल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच कुत्र्यांची भ्रमंती वाहनधारकांच्या जिवावर बेतणारी ठरली.
कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांच्यावर नसबंदी करण्यात येते. तशी यंत्रणा नाशिक शहरातही राबविण्याची मागणी होत आहे.