गेल्या काही वर्षांपासून सावर्जनिक गणेशोत्सव म्हणजे डीजेचा दणदणाट हे समीकरण रूढ झाले असताना न्यायालयाच्या आदेशामुळे पोलीस यंत्रणेने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवासाठी पोलिसांनी पत्र पाठविण्यास सुरुवात केल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, डीजेच्या वादामुळे लुप्त पावत चाललेल्या ‘ढोल संस्कृतीला’ पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार असून अनेक सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीसाठी ढोल पथकाचा आग्रह धरला आहे.
गणेशोत्सव म्हटला की, ढोल-ताशाचा गजर अथवा डीजेच्या दणदणाटात सुरू असलेली कर्णकर्कश आवाजातील गाणी हे नेहमी दिसणारे चित्र. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ध्वनिप्रदूषणाला काहीअंशी आळा बसण्याचा मार्ग खुला झाला आहे. गणेशोत्सव काळात डीजेबाबत न्यायालयाने काही निकष लावले आहेत. या पाश्र्वभूमीवर पोलीस यंत्रणेने गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी डीजेमुक्त गणेशोत्सवाला प्राधान्य दिले आहे. आवाजाची पातळी ओलांडली जाणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, अशी सूचना करणारे पत्र सार्वजनिक मंडळांना दिले जात आहे. तसेच दबावतंत्र वापरून वर्गणी गोळा करणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचाही इशाराही दिला गेला आहे. याबाबत विभागनिहाय बैठका होत आहे. पोलिसांच्या भूमिकेवर सार्वजनिक गणेश मंडळांनी आक्षेप घेतला आहे.
भद्रकालीतील शिवसेवा युवक मित्र मंडळाचे विनायक पांडे यांनी मंडळाला डीजे वापरण्यावर बंदीचे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. तसे काही लेखी किंवा तोंडी सूचना आलीच तर केवळ हिंदूंच्या सणामध्ये गोंगाट होतो का, त्यांच्या सणोत्सवावर बंदी का, असा प्रश्न उपस्थित केला जाईल. या विषयी पोलिसांशी चर्चा करत समन्वयातून मार्ग काढण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले.
दंडे हनुमान मित्र मंडळाचे गजानन शेलार यांनी कोणत्याही वाद्यावर बंदी घालण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव वाजतगाजत साजरा होत आहे. या स्थितीत दहीहंडी, गणेशोत्सवावर आवाजाच्या दृष्टीने अशी बंदी का, असा प्रश्न त्यांनी केला. पोलीस आडमुठी भूमिका घेत असून न्यायालयाने डीजेवर नाही तर आवाजाच्या पातळीवर मर्यादा आणल्या आहेत. पोलिसांची ही भूमिका कायम राहिली तर सार्वजनिक मंडळे निषेधासाठी आंदोलनाचे हत्यार उपसतील, असा इशारा शेलार यांनी दिला. डीजेवरून पोलीस आणि मंडळे यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे असताना पारंपरिक वाद्य तसेच ढोल पथकाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. डीजेवर बंदी येण्याची शक्यता असल्याने मिरवणुकीसाठी अनेक मंडळांकडून ढोल पथकांकडे विचारणा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव केवळ निमित्त आहे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, अनेकांकडून मानाच्या मिरवणुकीत सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने ढोल संस्कृतीला ‘अच्छे दिन’ येत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करत असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले.

कारवाई होणार
सार्वजनिक गणेश मंडळांना डीजे वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी विभागनिहाय पोलीस ठाण्यात मंडळ प्रतिनिधींच्या बैठका सुरू असून त्यादृष्टीने पत्रव्यवहार होत आहे. आवाज मोठा ठेवा, पण ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडली जाणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच या काळात दबाव तंत्राद्वारे वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न झाल्यास सार्वजनिक गणेश मंडळात देणगीच्या नावे खंडणी वसूल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. राजकीय वरदहस्त लाभलेली सार्वजनिक गणेश मंडळे यावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
– लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त)

ढोल पथकांना ‘अच्छे दिन’
मिरवणुकीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या ढोलांची संख्या, मंडळांची आर्थिक क्षमता आदी निकषांवर पथकाचे मानधन ठरते. पथकाची कमाई किती होते यापेक्षा लुप्त होणारी ढोल संस्कृती, वादन कला पुन्हा एकदा नाशिकच्या सांस्कृतिक पटलावर दिमाखात येत आहे याचे स्वागत होणे गरजेचे आहे. ढोल पथक राजकीय वरदहस्ताने किंवा पक्षाच्या आधिपत्याखाली असेल तर आर्थिक निकषांचा विचार जरूर व्हावा. मात्र स्वतंत्रपणे ‘ना नफा ना तोटा’ यावर काम सुरू असेल तर आर्थिक निकषांचा विचार नकोच.
– कुणाल भोसले (शिवसाम्राज्य ढोल पथक)