रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी लग्नसोहळा आणि स्वागत सोहळ्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कमी गर्दीच्या इतर स्थानकावरील फलाटावर हा प्रयोग राबविला जाऊ शकतो.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत कमी गर्दीची फलाटे महसुली उत्पन्नासाठी वापरता येतील काय, यासह रेल्वेला अधिक उत्पन्न मिळविण्याचे कोणकोणते स्रोत वापरता येतील यावर चर्चा झाली. त्या अंतर्गत हा प्रस्ताव सादर झाला आहे. विमानात कधीकधी लग्न सोहळे पार पडल्याची उदाहरणे आहे. या पाश्र्वभूमीवर, रेल्वे स्थानकावर विवाहबद्ध व्हावे, अशी इच्छा असू शकते. त्यातून ही कल्पना पुढे आली. मनमाड हे मोठे स्थानक असून सध्या फलाट क्रमांक एक हा कमी गर्दीचा व प्रवासी गाडय़ांची वर्दळ नसल्याने सोयीचा व प्रशस्त उपलब्ध आहे. अनेकदा विविध प्रदर्शनाच्या रेल्वेगाडय़ा याच ठिकाणी दोन दोन दिवस उभ्या असतात. त्यालगत पार्सल, गोदाम, वाहनतळाचीही सुविधा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पुलाची आवश्यकता नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जून अशा तुलनेने कमी गर्दीच्या वेळी असलेल्या मुहूर्तासाठी रेल्वेला अशा सोहळ्यातून मोठे उत्पन्न मिळू शकते.

मुंबई, पुणे किंवा इतर रेल्वे स्थानकांवर नेहमीच गर्दी असते, तेथे लग्न सोहळ्याचे आयोजन होऊ शकत नाही. मात्र तुलनेत कमी गर्दी असलेल्या स्थानकांवर हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले जात आहे.