कडेकोट सुरक्षा व्यवस्था; प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात दहशतवादी संघटना घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर, मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्या अंतर्गत बुधवारी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून रेल्वे सुरक्षा दलाच्या ‘सूर्या’ या श्वानपथकाच्या वतीने संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली. तसेच रेल्वे स्थानकात व रेल्वे ट्रॅकवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था व गस्त तैनात करण्यात आली आहे. प्रवासी व नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

कानपूर आणि भोपाळच्या घटनेनंतर आता महाराष्ट्रातील रेल्वे रुळावर घातपात होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. राज्य पोलिसांनी रेल्वेला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची सूचना केली आहे. राज्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भिकारी किंवा अनोळखी विक्रेत्यांच्या वेशात दहशतवादी घातपात घडून आणू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, रेल्वे जंक्शन स्थानकात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या अनुषंगाने रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलीस यांच्यातर्फे बुधवारी व्यापक सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. भुसावळ येथून आलेल्या ‘सूर्या’ या प्रशिक्षित श्वानाने सकाळी मनमाड रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला. स्थानकातील सर्व सहा फलाट, रेल्वेची विविध कार्यालय, प्रवासी विश्रामगृह आणि रेल्वे मार्ग, पादचारी पूल, बुकिंग कार्यालय अशा सर्व ठिकाणी सूर्याने कसून तपासणी केली. सामान्य विश्रामगृह आणि पादचारी पुलासह स्थानकातील मोकळ्या जागेत बेघर आणि भिकारी मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास असतात. त्यांच्या कसून तपासणीवर सूर्याने भर दिला. रेल्वे पार्सल विभागातील सर्व साहित्याची श्वानाने बारकाईने तपासणी केली. याचवेळी स्थानकावर आलेल्या सचखंड एक्स्प्रेसच्या सर्व बोग्यांमध्ये फेरफटका मारून तपासणी केली. यावेळी नागरिक आणि प्रवाशांची उत्सुकतेपोटी मोठी गर्दी झाली होती. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक के. डी. मोरे, लोहमार्ग साहाय्यक निरीक्षक संजय कुलकर्णी, उपनिरीक्षक मधुकर सोनवणे यांच्यासह कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.