मुंबई-आग्रा मार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय; नाशिकहून अनेकांनी लोकलने मुंबई गाठली

मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवारी पहाटेपासून निघालेल्या वाहनांमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले.  महामार्गावरील टोल नाक्यांवर केवळ भगवे झेंडे व मोर्चाचे फलक लावलेल्या वाहनांना सवलत देण्यात आली. मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाचा प्रभाव कसारा-मुंबई लोकल सेवेवर दिसला. नाशिकहून अनेकांनी लोकलद्वारे मुंबई गाठण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, या दिवशी रेल्वे गाडय़ांमध्ये जागा मिळणार नसल्याचे लक्षात घेऊन दररोज नाशिक-मुंबई ‘अप-डाऊन’ करणाऱ्या बहुतेकांनी प्रवास करणे टाळले.

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण, कृषिमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव, कोपर्डीतील दोषींना कठोर शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात रसद पुरविली गेल्याचे स्पष्ट झाले. एसटी महामंडळाने मोर्चासाठी जादा बसगाडय़ांची व्यवस्था न केल्याने मोर्चेकऱ्यांची भिस्त खासगी वाहने व रेल्वे गाडय़ांवर राहिली. मंगळवारी रात्रीपासून नाशिक रोड रेल्वे स्थानक भगवे झेंडे घेऊन आलेल्या मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले. मोर्चासाठी जथेच्या जथे निघाले होते. त्यात तरुणाईचा अधिक सहभाग असला तरी महिला व आबाल-वृद्धांमध्येही उत्साह पाहावयास मिळाला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस दलाने बंदोबस्तात वाढ केली.

रेल्वे मार्गाप्रमाणे रस्ते मार्गावरही वेगळी स्थिती नव्हती. मुंबईतील मोर्चाची तयारी महिनाभरापासून केली गेली होती. स्थानिक मराठा समाजातील मंडळींनी गावोगावी खासगी बस, जीप व तत्सम वाहनांची व्यवस्था करीत बांधवांना मुंबईत नेण्याची व्यवस्था केली. चारपदरी रस्त्यामुळे वाहनांद्वारे साडेतीन ते चार तासांत मुंबई गाठता येते. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून अनेकांनी पहाटेपासून मुंबईला निघण्यास प्राधान्य दिले. भगवे झेंडे, मराठा मोर्चाचे फलक लावलेली शेकडो वाहने महामार्गावरून मार्गस्थ झाली. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शासनाने एका दिवसापुरती टोलवसुली बंद ठेवण्याचे सूचित केले होते; परंतु त्याचा लाभ मोर्चासाठी निघालेली वाहने वगळता अन्य खासगी वाहनांना मिळाला नाही. टोल कंपन्यांनी संबंधितांकडून टोलवसुली सुरू ठेवली. मोर्चेकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा, अल्पोपाहार, वाहनतळ व्यवस्था, पाणीवाटप आदी तजवीज करण्यात आली. मोर्चेकऱ्यांना सभेच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमलेल्या ७८० स्वयंसेवकांनी मार्गदर्शनाचे काम केले. मोर्चात सहभागी झालेल्यांसाठी घोटी टोल नाक्यासह इतर ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आले. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनधारकांनी घोटी टोल नाका परिसरात थांबणे पसंत केले. घोटीपासून पुढे वाहतूक कोंडीत भर पडू नये याकरिता मोठय़ा वाहनधारकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपली वाहने लावून दिली. त्यामुळे टोल नाक्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र वाहतूक सुरळीत होती.

अल्पोपाहार आणि वाहतूक नियमांचे प्रबोधन

इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाक्यावर नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ  ब्रिगेडतर्फे मोर्चेकरी बांधवांसाठी बटाटा मसाला, पुरीभाजीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मुंबईत मोर्चानिमित्त भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कल्याणसाठी ४० हजार अल्पोपाहार पाकिटे तयार करण्यात आली होती. साक्री, धुळे, नंदुरबार, मालेगाव, जळगाव, उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी घोटी टोल नाक्यावर हजारो पुरीभाजीच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांसाठीही अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. या वेळी चालकांना वाहतुकीच्या सूचना, सीट बेल्टचे फायदे, व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यापक प्रबोधन करण्यात आले. घोटी टोल नाक्यावर पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनधारकांनी घोटी टोल नाका परिसरात थांबणे पसंत केले.

रेल्वेची विशेष व्यवस्था

एरवी फलाट क्रमांक एक व दोनवर रेल्वे थांबतात; परंतु मोर्चेकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन या दिवशी काही रेल्वे गाडय़ा प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक चारवर वळविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रात्री जाणाऱ्या पवन, अमृतसर, कृषीनगर, शालिमार, शिर्डी-दादर, हावडा, मंगला एक्स्प्रेससह सकाळच्या विदर्भ, पंजाब, मंगला, राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम आदी गाडय़ांमधून मोर्चेकरी मुंबईला मार्गस्थ झाले. काही रेल्वे गाडय़ांना जादा बोगी लावण्यात आल्या होत्या, परंतु मुंबईला जाणाऱ्यांची संख्या इतकी मोठी होती की त्या बोगीसह अनेक डबे केवळ मोर्चेकऱ्यांनी व्यापले होते. ज्येष्ठ व महिलांना रेल्वेत प्रवेश करताना अडचणी येऊ नयेत, याची दक्षता स्वयंसेवक घेत होते. नाशिकहून बसने कसारा गाठून पुढे लोकलने थेट भायखळ्यापर्यंत जाण्याचा मार्ग अनेकांनी पत्करला. यामुळे कसारा-मुंबई लोकलमध्ये आधिक्याने मोर्चेकरी दिसत होते.