पाडगांवकराच्या भाषेत ‘प्रेम म्हणजे . प्रेम म्हणजे .. प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं’ असे कितीही म्हटले तरी प्रत्येकाची अभिव्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. येत्या रविवारी प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त मिळणार असल्याने आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला खूश करण्यासाठी अनेकांनी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. तरुणाईची आवड लक्षात घेत बाजारपेठ सजली असून छोटय़ा आकारातील ‘लव्ह हार्ट्स’सह विविध पर्याय उपलब्ध आहे. राजकीय पक्षांचा विरोध मावळल्याने तरुणाईला अप्रत्यक्ष मोकळीक मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात शहर परिसरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचा प्रघात वाढला आहे. यासाठी काही महाविद्यालयांमध्ये अप्रत्यक्षपणे ‘व्हॅलेंटाइन वीक’ ही सुरू असून आपल्या खास मित्र किंवा मैत्रीणाला खूश करण्यात तरुणाई मग्न आहे. रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे.. अशा विविध दिवसातून व्हॅलेंटाइनची एक प्रकारे रंगीत तालीम सुरू असते. रविवारी असणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी देशी-विदेशी गुलाबांच्या फुलांमुळे बाजारपेठ गुलाबी रंगात रंगली असताना भेटवस्तूंची दालने प्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘लाल’ रंगाने सजल्याचे दिसते. यानिमित्ताने चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडी बेअर, संगीतमय भेटकार्ड, फोटो मग्स, हार्ट शेपमध्ये की-चेन, गॉगल्स, टोप्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅसेसरीज, फोटो फ्रेमसह विविध पर्याय अगदी १० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. काही तरुणांनी आपला मोर्चा ऑनलाइन शॉपिंगकडे वळविला आहे. चॉकलेट बुके, केक, अ‍ॅसेसरीज, पर्स, बॅग्स, कॅफलिनमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचे छायाचित्र असे काही हटके पर्याय निवडले जात आहेत.
भेटवस्तू खरेदी करताना लाल रंगाच्या वेष्टनात त्या असाव्यात, असा आग्रह होताना दिसतो. व्हॅलेंटाइन डे रविवारीच येत असल्याने काहींनी घराबाहेर पडण्यास कितपत संधी मिळेल हे गृहीत धरून हा दिवस एक दिवस आधीच म्हणजे शनिवारी साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी महाविद्यालय परिसरातील हॉटेल्स, कॅन्टीन याकडे त्यांचे लक्ष आहे. काहींनी गर्दी गोंधळातून बाहेर पडत शहरालगतच्या काही विशिष्ट ठिकाणी भ्रमंती करण्याचे ठरवले आहे. हा दिवस साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवत ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन केले आहे.
काही वर्षांपूर्वी काही राजकीय पक्षांचा व्हॅलेटाइन डेला असणारा विरोध मावळल्याने तरुणाईला हा दिवस उत्साहात साजरा करता येतो. याच दिवशी काही सामाजिक संघटनांनी प्रेम दिनाऐवजी आजी-आजोबांसाठी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे.