मनमाड व नांदगाव शहरांसाठी बाहय़ वळण रस्ता तयार करण्यासंदर्भात भूसंपादनाच्या विषयावर २६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता येथील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासगीकरणांतर्गत चांदवड-मनमाड-पानेवाडी रस्त्याचे चौपदरीकरण, पानेवाडी-नांदगाव रस्ता दुपदरी तसेच मनमाड व नांदगाव बाहय़ वळण रस्ता बांधणे, या कामांसाठी भूसंपादन हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. चांदवड-मनमाड-नांदगाव रस्त्याचे खासगीकरणांतर्गत सुधारणा करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आले असून त्याअंतर्गत मनमाड-नांदगाव शहरासाठी बाहय़ वळण रस्ते प्रस्तावित आहे. या कामात काही शेतकऱ्यांची जमीन येत आहे. भूसंपादनाचा मोबदला प्रचलित कायद्यानुसार वाटाघाटीने तातडीने देण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. खासगीकरणांतर्गत संबंधित रस्त्याचे चौपदरीकरण आणि बाहय़ वळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी १३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी येऊनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व चालढकल तसेच बेपर्वा वृत्तीमुळे काम रखडले
राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने २०१४ मध्ये या प्रकल्पास मान्यता देऊन भूसंपादनासाठी लागणारी रक्कम मंजूर केली. यानंतर उद्योजक नेमण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. निविदा प्रस्तावास शासनाची मंजुरी प्राप्त झाली. मात्र सदर प्रकल्पाकरिता आवश्यक असलेल्या सुमारे ६८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाल्याशिवाय या रस्त्याचे काम सुरू करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काम रखडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.