सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या चर्चासत्रातील सूर

व्यापारी, निर्यातदार तसेच गुंतवणूकदारांसाठी वस्तू सेवा कर प्रणाली अर्थात जीएसटी अनुकूल असल्याचा सूर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रातून निघाला. या चर्चासत्रात ही करप्रणाली कशी सोपी व सुटसुटीत, पारदर्शक आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

देशात १ जुलैपासून जीएसटी लागू होत असून जीएसटीसंबंधी उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये अद्यापही मोठय़ा प्रमाणात संभ्रमावस्था आहे. जीएसटीमुळे नेमके काय होणार, त्याचा उद्योगांवर कोणता परिणाम होऊ शकतो, कारखानदारांना त्याची झळ बसेल काय असे अनेक प्रश्न उद्योजक, निर्यातदार तसेच व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येऊ लागल्याने त्यांच्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने डेव्हलपमेंट ऑफ सिंगापूर, मायक्रोलिंग कॉम्प्युटर्स यांच्या सहकार्याने सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्थेच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन केले गेले.

चर्चासत्रात प्रथम मार्गदर्शक चार्टर्ड अकाऊंटंट चेतन बंब, सचिन तोष्णिवाल, डी. बी. एस. बँकेचे चारुदत्त सातपुते यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अविनाश तांबे, उपाध्यक्ष किशोर देशमुख, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे आदींच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर तांबे यांनी प्रास्तविकात जीएसटी कराविषयी उद्योजकांमध्ये असलेले भय तसेच उत्सुकतेचा मुद्दा मांडला. सर्वाना आज ना उद्या जीएसटी कराचा स्वीकार करावा लागणार आहे. जीएसटी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होणार असल्याने त्याला सामोरे जावे लागणारच असल्याने शंकांचे समाधान करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चार्टर्ड अकाऊंटंट चेतन बंब, सचिन तोष्णिवाल यांनी जीएसटीविषयी उद्योजकांना सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये केंद्र व राज्य शासन यांच्या कर पद्धतीविषयी विवेचन करण्यात आले. यापूर्वी अनेक कर होते. त्याऐवजी आता एकच कर राहणार आहे. करांवर कर नाही. संपूर्ण भारतात सारख्या किमती व कररचना कशी असेल, एक कर, एक परतावा, एकाच कार्यालयाशी संपर्क अशा अनेक मुद्दय़ांबाबत सचित्र सादरीकरण करण्यात आले. तसेच टॅली सॉफ्टवेअरद्वारे बँकेतून कसे व्यवहार होतील याविषयी नमूद करण्यात आले. डीबीएस बँकेचे शाखाधिकारी चारुदत्त सातपुते यांनी जीएसटी कर भरण्याविषयी बँकेची पद्धत काय राहील, याविषयी मार्गदर्शन करीत अधिकाधिक उद्योजकांनी जीएसटीसाठी बँकेत खाते उघडण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष किशोर देशमुख यांनी आभार मानले.